पाऊस पडून गेल्यावर मी आश्रमात गेलो. मुख्य दारातून आत गेल्यावर एक महाकाय झाड होतं त्याच्या पुढे उजव्या बाजूला रोजचं कामकाज पाहायला एक कचेरी होती त्याच्या शेजारी अजून एक खोली होती आणि पुस्तकविक्री केंद्र होतं.त्या पुस्तकविक्री केंद्राला लागून ज्या पायऱ्या आहेत ती जागा मला आवडली आणि तिथेच बसायचं ठरवलं.एका खांबाला टेकून पाय पसरून बसायला आणि आजूबाजूला पाहायला चांगलं वाटत होतं.आश्रमाविषयी नंतर कधीतरी लिहीन तो प्रवास वेगळाच आहे.
दुपारी आश्रम संथ असतो. येणारी माणसं तशी कमी असतात.मी जिथे बसलेलो तिथून समोरच एक भली मोठी विहीर आहे ज्यावर माकडं बसलेली दिसली. काही साधू माझ्या समोरच्या भागातल्या एका चौथऱ्यावर विश्रांती घेत होते.माझ्या शेजारी एक कुत्रा झोपलेला. झोपेतही कानाशी माशी आल्यावर त्याचा कान हलत होता.डास कानाशी आल्यावर असं करता आलं असतं तर माणूस किती सुखी झाला असता.पावसाळी वातावरण होतं त्यामूळेच मोरही दुपारची वेळ असूनही दिसत होते. साधारण दोन तास मी तिथेच बसून राहिल्याचं लक्षात आलं तरीही अजून बसावसं वाटत होतं.
हळूहळू लोकांची येजा सुरू व्हायला लागली. एक परदेशी आजोबा पांढरी बंडी आणि धोती अशा वेशात एका हातानी धोती सावरत आत गेले.स्वच्छ पांढरी धोती आणि बंडी नसली तरी ते सरावलेले कपडे आहेत हे समजत होतं.त्यांच्या हातात काही नव्हतं खांद्यावर एखादी पिशवीही नव्हती त्यावरून ते इथे रोज येत असावेत असा उगीचच एक अंदाज बांधला.हळूहळू एक एक करत अनेक परदेशी माणसं तिथं आली,काही भारतीय माणसंही आत दर्शनाला गेली. छोट्या माकडांच्या डोक्यातल्या उवा काढणाऱ्या त्यांच्या आया,उगीचच आवाज काढणारी आणि एकमेमांशी भांडणारी काही माकडं, काही मोर ,शेजारचं कुत्रं आणि मी तिथंच बसून होतो.एक दोन मांजरं या गर्दीतून वाट काढत समोरच्या वाळूत टाईमपास करत होती.एक खार माझ्या शेजारच्या खांबावर बसून दोन्ही हातानी फोडून दाणे खात बसलेली.दाणे कसे मिळाले देवच जाणे.हे सगळं सुरू असताना उजवीकडच्या मुख्य आश्रमाच्या रस्त्यावर असलेल्या चार पायऱ्यांच्या इथे अचानक धावपळ सुरू झाली आणि काही माणसं एक शब्द एका सुरात उच्चारत घाईघाईनी जमली.तामीळ येत नसल्यानी मला तो शब्द ज्या प्राण्यासाठी उच्चारला त्याचंच साक्षात दर्शन घडलं.एक भलामोठा काळा साप तिथे आलेला. साप या प्राण्याविषयी मला वेगळीच किळस आणि भिती अशी संमिश्र भावना आहे.तो सरपटत गेला की माझ्या मेंदूतल्या तारा वेगळ्याच वागायला लागतात.तो तसा भलामोठा साप सरपटत कुठे जाणार याचे अंदाज बांधले गेले. तेव्हढ्यात एका माणसानी त्याला पकडलं तरी तो साप शांत होता.सगळ्यांना वाटलं आता कुठेतरी दूर नेऊन त्याला सोडतील पण तो माणूस पायऱ्या चढून वर गेला आणि पुढे झाडांत त्याला सोडून दिलं.सापही त्याच्या कामाला गेला ज्यानी पकडलं तोही त्याच्या कामाला गेला.इथे माझ्या शेजारी मात्र गर्दी जमली.तो माकडांचा समूह साप दिसल्यावर माझ्या शेजारच्या पायऱ्यांवर येऊन बसला.कुत्रा तिथेच बसून नक्की काय सुरू आहे बघत होता आणि जरा अंदाज लागला असं वाटलं की शेपूट हलवून दाद देत होता. मांजरंही अगदी सावरत सावरत कान टवकारत आपल्याला कोणी बघत नाही अशा पद्धतीनी कचेरीच्या जवळ बसली.खारूताईचं मात्र लक्ष दाण्यांकडेच होतं. दोन मोर माझ्या डावीकडे जागा होती तिथे उभे राहून त्या गर्दीकडे लक्ष देत होते. इतके विविध प्राणी तिथे बसून काय सुरू आहे बघत होते.साप मोरांच भक्ष्य आहे हे ते दृष्य बघून खोटं वाटलं.प्रत्येक जीवाला मिळणारी आंतरीक सुचना सारखी असते हे तिथल्या इतर प्राण्यांच्या वागण्यातून समजलं.
एकंदरीतच मजेशीर प्रसंग होता तो.
लेखकाच्या नजरेतून अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुटत नाही..आणि अश्या छोट्या छोट्या गोष्टींच्या अनुभवातून माणूस कसा समृद्ध होतो हे वाचताना जाणवलं..
खूप छान..
All the best !