तिरुवन्नमलैच्या वाटेवर…
होसूर रस्त्यानी कृष्णगिरी येईपर्यंत डोळा लागला त्यानंतर तिरुवन्नमलैच्या रस्त्याला गाडी लागल्यावर जाग आली. ड्रायव्हर भरधाव वेगानी गाडी चालवत होता.रात्रीची वेळ होती त्यामूळे समोरून अगदी तुरळक गाड्य़ा येत होत्या.संपुर्ण बस तशी झोपली होती. अजून साधारण दोन अडीच तासांचा प्रवास बाकी होता. मल प्रवासात एकदा जाग आली की परत झोप येणं कठीण असतं मग काहीतरी उद्योग म्हणून गाणी ऐकणे,खिडकीतून पाहणे असे प्रकार करण्यात वेळ घालवत होतो. लोकांचे झोपण्याचे प्रकार किती आहेत याचाही एक अभ्यास केला. मी संपुर्ण भारतात अनेक ठिकाणी अनेक राज्यात हिंडलोय त्यामूळे अनेक प्रकारच्या बसेस मधून अनेक प्रकारच्या सरकारी,खाजगी बस मधून फिरलोय या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अगदी सारखी असते ती म्हणजे या सगळ्या बसेस मधे एक तरी माणूस आपल्याशी विनाकारण बोलतो.अगदी आपली इच्छा नाही हे कळूनही तो बोलायचा प्रयत्न करतोच हटकून.त्यामूळे हा रात्रीचा प्रवास कधी कधी अगदी सुसह्य होतो कारण सगळेच झोपतात त्यामूळे उगीचच प्रवासी सलगी दाखवायचा कोणी प्रयत्न करत नाही. माझ्या शेजारी साधारण पन्नाशीचा अगदी एक टिपीकल तामीळ माणूस होता.भडक पिवळा शर्ट आणी धोती असा त्याचा वेश होता.तामीळ खेड्यातली लोकं कान खाजवायला किंवा दात कोरायला हातात एक काडी बाळगतात. हे प्रमाण १०० मध्ये ९० आहे. हा माणूस शहरी असावा असं मला जाणवलं त्यामागे काडी नसणे हाही एक पुरावा होता.दुसरं म्हणजे खेड्यातली लोकं अतिशय बडबडी असतात. आपल्या शेजारी कोण बसलंय त्याला तामीळ येतंय नाही न बघता अगम्य तामीळ भाषेत बडबड करायला लागतात.बिडी पुढे करतात,कधी कधी आपण चुकलोय हे लक्षात आलं की मग तामीळ इल्लै? म्हणून खजील होतात. शहरी माणसं जरा मोजून मापून वागत असतात. अंदाज घेतात आणी मग ठरवतात बोलू का नको.हा शेजारचा माणूस बराच वेळ झोपलेला होता. मला जाग आल्यावरही हा अगदी गाढ झोपलेला. झोपण्यासाठी बस तशी गैरसोयीची असल्यानी सारखी चुळबूळ करावीच लागते ती या बिचाऱ्यालाही चुकली नाही. एकदा डावी एकदा उजवी कुस असं करून झाल्यावर मग सरळ झोपला.तेही करून झाल्यावर मग थोडा वेळ समोरच्या बारवर डोकं ठेऊन झोपला.एका खड्यामुळे मग त्याचं डोकं चांगलच आपटलं मग काही सेकंदापुरता तो जागा झाला आणि परत झोपी गेला.
माझ्या पुढे एक माता आणि तिची लहान मुलगी होती त्या दोघी घरी असल्यासारख्या झोपल्या होत्या.
हे सगळं सुरू असताना अचानक एक विचार मनात आला मी पुण्यातला मनुष्य या सगळ्या तामीळ लोकांमध्ये कसा काय आलो.माझं संपुर्ण आयुष्य पुण्यात मराठी घरात गेलंय मग मी इथे आलोच कसा. माझी आई कर्नाटकमधली आहे मग मी कानडी लोकांमध्ये असणं तसं नैसर्गिक असु शकतं पण तामीळ लोकं मला आपलीशी वाटणं चमत्कारीकच आहे.यामागे काय कारण आहे हे मला शोधायला आवडेल पण कसं शोधणार. मागील जन्मांचा काही संदर्भ असेल तर असे प्रकार घडू शकतात याची मला खात्री आहे.
किंवा मी जे तत्त्वज्ञान शिकलो ते मला या तिरुवन्नमलैला अगदी सहज उपलब्ध आहे त्यामूळे त्याचा परिणाम म्हणून मला इतर तामीळ पद्धती,चालीरिती आवडत असाव्यात किंवा मी त्या आपल्या म्हणून घेत असीन.कारण एक सामान्य तामीळ माणूस हा अतिशय कर्मठ समजला जातो तो या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करेल अशी शक्यता कमी आहे.त्यामुळे मला त्या चालीरिती आवडण्याची शक्यता खुप कमी आहे तरीही मला त्या अजिबात चुकीच्या वाटत नाहीत. निसर्गात इतके चमत्कार आहेत हाही तसाच एक चमत्कार असा विचार करून मी तो विचार तात्पुरता थांबवला.
तिरुवन्नमलै यायला अजून तीस किलोमीटर शिल्लक असल्याची पाटी बघून नवीन उत्साह संचारला.तिरुवन्नमलैला तसं अनेक वेळा आल्यामूळे रस्त्याची तशी बरीच माहीती होती. चेंगम नावाचं एक तसं बऱ्यापैकी मोठं गाव गेलं की साधारण अर्ध्या पाऊण तासात तिरुवन्नमलै येतं.चेंगमला साधारण ३ वाजता बस आली.एक दोन प्रवासी उतरले आणि बस पुढच्या प्रवासाला निघाली.माझ्या शेजारचा मनुष्य अजूनही झोपलेला होता. मी पुढे उतरायचं आहे या नादात जरा सावरून बसलो.बॅग वगैरे कुठे आहे जरा अंदाज घ्यायला लागलो.तिरुवन्नमलै जवळ आल्याची एक खूण आहे अरुणाचल पर्वत. तामीळ लोकांनी पंचमहाभूतांना वेगवेगळ्या ठिकाणांशी जोडलंय आणि तिथे अतीभव्य मंदीरांची निर्मीती केली आहे.ते तिरुवन्नमलै हे ठिकाण अग्नी तत्त्वाचं प्रतीक आहे असं समजतात. तिथलं अरुणाचलेश्वर मंदीर किंवा अण्णामलयार मंदीर हे अग्नीतत्त्व समजलं जातं आणि अरुणाचल पर्वत साक्षात शंकर आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे.तिरुवन्नमलै हून साधारण ५ तासांवर चिदंबरम हे ठिकाण आहे तिथे नटराजाचं एक अतीशय भव्य आणि सुंदर मंदीर आहे ते आकाश तत्त्वाचं प्रतीक समजलं जातं. वायूतत्त्वाचं मंदीर हे तामीळनाडूच्या बाहेर आंध्रप्रदेशात कालहस्तेश्वर मंदीर स्वरूपात आहे.जल तत्त्व असलेलं मंदीर जंबुकेश्वर मंदीर म्हणून ओळखलं जातं ते तिरुचिरापल्ली अर्थात त्रिचीला आहे.या मंदीरात एक जिवंत पाण्याचा स्रोत आहे. पृथ्वी तत्त्वाचं मंदीर हे कांचीपुरमला आहे ते एकांबरेश्वर मंदीर म्हणून ओळखलं जातं.
खरं तर ही सगळी माहिती मला नंतर समजली. माझं तिरुवन्नमलैला जायचं कारण वेगळंच आहे.
चार ते पाच वर्षांपुर्वी मी कोलकत्ताला गेलेलो तिथे माझ्या तिरुवन्नमलैला जायचे संदर्भ लपलेले आहेत त्याविषयी नंतर सांगीन. तर तो एक वेगळा पर्वत आहे हे लगेच लक्षात येतं असा त्याचा आकार आहे. तो दिसला की आपण एका वेगळ्या दुनीयेत आहोत याची जाणीव व्हायला लागते.पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला या पर्वतानी भुरळ घातली आणि तो प्रवास दिवसाचा असल्यामूळे मी त्याच्याकडे बघत बसलेलो.तेंव्हा त्या पर्वताची काही माहीती नव्हती त्याचं महात्म्य माहीत नव्हतं तरी मी खूप वेळ पाहात बसलेलो.म्हणलं तर दगडांनी बनलेला म्हणलं तर आत्मा असलेला.ज्याच्या त्याच्या बघण्याचा विषय आहें. मला तो पर्वत ज्यांचा त्याच्या पायाशीच आश्रम आहे त्या तपस्व्यासारखा दिसला. रात्रीच्या प्रवासात तो अनंताचं प्रतीक असणाऱ्या शंकरासारखा दिसला. त्याच पर्वतावर एक नंदीसुद्धा आहे तो आपल्या दैवताकडे सतत बघत कृपेची अपेक्षा करताना दिसतो.काहीतरी नक्की या पर्वतात आहे जे आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतं.ते आकर्षण शब्दात वर्णन करून उपयोग नाही.तिथे प्रत्यक्ष जाऊनच तो अनुभव घ्यायला हवा.शब्दांचं माध्यम वापरतोय आणि शब्दात वर्णन करता येणार नाही सांगतोय तर त्यात माझं लेखक म्हणून कॉशल्य कमकुवत असेल किंवा माझ्या सांगण्यात काहितरी तथ्य असेल.असो.चेंगम रोड असा एक फाटा उलट बाजूनी आपल्याला दिसला की समजायचं उतरायची वेळ जवळ आली. बऱ्याचदा मी आश्रमाजवळच उतरतो पण त्यावेळी आश्रमाजवळ बस थांबते ही माहिती नसल्यामूळे थेट स्टॅंडवरच उतरलो. या आश्रमाविषयी नंतर लिहीन.साधारण तीन चार किमी चालावं लागणार या विचारानी थोडा वैतागलो. पहाटेचे साधारण ४ वाजलेले त्यामूळे माझी जिथे राहायची व्यवस्था होती ते ठिकाणही उघडलं नसणार हे माहीत असल्यानी २ तास वेळ घालवणं क्रमप्राप्त होतं.स्टॅंडजवळ काही चहाची छोटी ठिकाणं उघडी होती आणि मी चहा प्यायला तिथे थांबलो. तामीळ चहा सगळ्यांना मानवेलंच असं नाही. पाणी तापवायचा एक मोठा बंब असतो त्यात एक कप्पा असतो ज्यात चहाची पावडर टाकून डिकॉक्शन तयार केलं जातं.एक कप चहा तयार करताना आधी अर्धा कप उकळतं पाणी कपात ओतलं जातं,त्यात चांगली सढळ हातानी साखर टाकली जाते,त्यात चहाची पावडर त्या उकळत्या बंबाच्या कप्प्यात टाकून जे मिश्रण तयार झालंय ते ओतलं जात त्यात उकळतं दुध टाकून तो दुसर्या एका रिकाम्या कपात दोन हात उंच उडवला जातो आणि दिला जातो. तिथे चहा देणं हे एक प्रात्यक्षीक समजलं जातं किंवा एखादा कलाकार आपली कला सादर करतो तसं ते एक सादरीकरण असतं. पण तो चहा जरा कडक असतो आणि सगळ्यांना तो आवडेलच असं सांगता येत नाही.मला आवडला. त्या छोट्या कलाक्षेत्रात अजून गर्दी झाली नव्हती,माझा चहा झाल्यावर मी त्या कलाकाराला आश्रमाचा पत्ता विचारला पण त्यानी जे सांगितलं ते फारसं कळलं नाही आणि मी पुढे निघालो.थोडं पुढे गेल्यावर काही ओळखीच्या खुणा दिसतात का ते पाहायला लागलो पण उजाडलं नसल्यामूळे काही स्पष्ट समजत नव्हतं.तसच पुढे चालत राहायचं असं ठरवून चालायला लागलो आणि एका छोट्या मंदीरापाशी साधारण साठीचा माणूस बाहेरूनच देवाला नमस्कार करताना दिसला.त्याने अतिशय स्वच्छ पांढरा शर्ट आणि पांढरी शुभ्र धोती नेसलेली अजूनही स्पष्ट आठवत आहे.मी त्याच्या जवळ गेल्यावरच त्यानी मला सरळ पुढे जायचा इशारा दिला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला.चष्म्याच्या मागे त्या काकांचे काळेभोर डोळे चमकलेले दिसले.पांढरी दाट दाढी त्यांच्या व्यक्तीमत्वाला आवश्यक वाटावी इतकी शोभत होती.मी त्यांना दोन्ही हातानी धन्यवाद म्हणत नमस्कार केला आणि पुढे जायला लागलो आणि परत एकदा ते व्यक्तीमत्व पाहावं म्हणून मागे पाहीलं तर तिथे कोणीच नव्हतं. मला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला आणि मी परत त्या मंदीरापाशी गेलो.त्या मंदीरातला दिवा सुरू होता पण तो माणूस तिथे कुठेच नव्हता.इतक्या भरभर चालत गेला असेल असं समजलं तरी तो जाईल असा एकच रस्ता मागे होता आणि तो पुर्ण रिकामा होतां.मला काही समजलं नाही आणि त्यानी सांगितलेल्या रस्त्यानी जायचं ठरवलं. तरी हा अनुभव बराच वेळ डोक्यात घोळत होता.
थोडा वेळ तसाच चालत राहिलो डावीकडे एक छोटंसं घर दिसलं आणि मी थांबलो. एका आजींचं घर ते घर होतं हे नंतर लक्षात आलं.घर तसं छोटसंच होतं. अर्ध्या घरावर तगरीच्या फुलाचं झाड पसरलेलं.घरापुढे अतिशय सुंदर रांगोळी काढलेली.एक बाकडं तिथे पसरलेलं.आत एक छोटासा दिवा लुकलुकत होता.बाकीचं काहीच अंधारामूळे दिसत नव्हतं.इतर चार घरांपेक्षा ते घर वेगळं वाटलं हे नक्की.असं कधीकधी होतं की काही वास्तू भव्यता,श्रीमंती या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारत थेट मनात जागा तयार करतात.आलीशान ही एखादी वास्तू चांगली असण्याची खूण नाही,अट नाही हे लक्षात येतं असं काही आपोआप मनात जाऊन बसतं.थोडावेळ ते घर न्हाहाळून पुढे चालायला लागलो.त्या रस्त्यावर मी एकटा होतो बाकी तसं शांतच होतं.एखादा ट्रक दुसऱ्या कोणत्या रस्त्यानी गेल्याचे पुसटसे आवाज येत होते.तामीळ लोकांना चित्रपटांचं विलक्षण आकर्षण आहे हे जागोजागी चित्रपटाच्या जाहीराती चिकटवल्यामूळे समजतं.एकंदरीतच भावना ओसंडून वाहणारी तामीळ लोकं चित्रपटाच्या बाबतीत पण अगदी ‘कट्टर’ आहेत. त्यावेळी जे चित्रपट लागणार होते त्या जाहीराती माझ्या शेजारून चाललेल्या त्याच काय त्या जाग्या होत्या.त्यातले अभिनेते प्रत्यक्षात माझ्याकडे बघत आहेत,मला मारायला धावत अंगावर येत आहेत अशी उगीचच कल्पना आली.चालत जाता जाता मला ‘त्या’ घरामूळे वास्तू आवडायला कशाचं बंधन नसतं हे लक्षात आलं आणि त्या जाहीरातींमूळे उगीचच हे सगळं क्षणभंगूर असल्याचा भास झाला.जसं एका जाहीरातीत तो नायक हसत हसत अभीनेत्रीकडे पाहात असतो आणि दुसऱ्या एका जाहिरातीत शत्रूकडे खुनशी नजरेनी पाहात असतो ते दिसलं. आपलं आयुष्य असेच निरनिराळे चित्रपट आहेत आणि आपण वेगळ्यावेगळ्या भुमिकाच तर पार पाडत असतो असे एकदम गहन विचार आले.
साधारण साडेपाच वाजता माझी राहायची व्यवस्था होती त्या आश्रमाच्या दारात येऊन थांबलो.अजून अर्ध्या तासानी आश्रम उघडेल असं दारावर लावलेल्या एका पाटीवर तामीळ अक्षरांच्या गर्दीत दिसलं. रात्रभर अर्धवट झोपेत केलेला प्रवास, त्या बसनी खाल्लेल्या खड्यांमध्ये मीही भागीदार होतोच ते खाल्लेले खड्डे,त्यानंतर पायपीट आणि आता अजून अर्धा तास वाट बघावी लागणार या कल्पनेनी पण कंटाळा आला.दमल्यामूळे हालचाली मंदावल्या होत्या तसाच त्या आश्रमाच्या कडेला सगळं सामान घेऊन उभा राहीलो.मग अचानक लक्षात आलं वैतागल्यामूळे तिथेच शेजारी एक चहाचं कलाकेंद्र उघडं आहे हे दिसलंही नव्हतं.मग काय,अर्धा तास सहज जाणार असं लक्षात आल्यावर थकवा शीण एकदम गायब.
तो चहावाला कलंदर माणूस,ते एकंदरीत ठिकाण,तिथलं वातावरण चमत्कारीक होतं.ती जागा एका बोळासारखी होती,आत गेल्यावर जेमतेम एका वेळी एक माणूस अशी साधारण चार ते सहा माणसं मावतील इतपतच जागा होती. भडक पिवळ्या रंगाची भिंत,एक दोन लाख तसबिरी,त्यांचे सोपस्कार केल्यामूळे पुर्ण काळं झालेलं छप्पर,मालकाच्या समोर वेगवेगळ्या बरण्यांमध्ये बसलेली बिस्किटं,नानकटाईचे प्रकार, एका कॅलेंडर वर लॉटरीच्या तिकिटांसारखे आकडे लिहिलेलं एक पुस्तक त्याच कॅलेंडरवर स्टेपल केलेलं,तारसप्तकात घोंघावणारा पंखा, ग्राहकांना बसायला दोन लाकडी बाकडी,वर्तमानपत्राचे ढीग असा सगळा पसारा आणी त्यावर कडी करणारा बाहेर चहा करणारा तो कलंदर.मला हे सगळं बघत असतानाच एखादं युग संपून दुसरं चालू होईल असा भास झाला.मी आतूनच त्या बाहेर असलेल्या माणसाला १ टी अशी खूण केली.तो माझ्याकडे बघून ठीक आहे अशी खुण करत खाली मान घालून आपलं काम करायला लागला.कलंदर अजस्र शरीराचा पण लहान मुलाचा चेहरा असलेला कसलेला कलाकार होता.त्याचे हावभाव हे त्याच्या एकंदर व्यवसायाला साजेसे नव्हतेच.तो खरंच अतिशय सॉम्य शब्दात खरं तर न बोलताच अतिशय सॉजन्यानी सगळ्यांचे चहाचे हट्ट पुरवत होता.एतक्या पहाटे फक्त ट्रकवाले,बस ड्रायव्हर,माझ्यासारखे काही प्रवासी,आणि गिरिवलमला जाणारे काही भक्त असे मोजकेच दर्दी तिथे होते.त्याच्या शरीरामूळे तो त्याच्या क्षेत्रात किती चपळ आणि सराईत आहे हे अविश्वसनीय होतं.एका वेळी साधारण चार चार जणांना तो चहा करून देत होता. आणि मगाशी सांगितलेल्या तामीळ पद्धतीनं! चॉफेर चहाचे कप फिरवल्यावर त्यानी आत येऊन मला चहा दिला. आत माझ्या समोर त्या छोट्याशा जागेचा मालक बसलेला.त्या मालकाला मी एक बिस्कीट मागितलं आणि त्यात अंडं आहे का विचार आला आणि त्याला विचारायचा प्रयत्न केला.त्याला इंग्लीश ‘एग’ शब्द कळेना आणि ‘अंडा’ तर शक्य नव्हतं मग मी त्याला गुगल करून अंड्याचा फोटो दाखवून विचारलं यात आहे का तर त्यानी दोन्ही हात कानाला लावले देवांना नमस्कार केले आणि माझ्याकडे रागानी पाहात ‘नाही’ असं सांगितलं.नंतर त्याचं वागणही बदललं,मग थोड्या वेळानी त्याच्या लक्षात आलं आणि तोच स्वतःहून तामीळ मध्ये तो तसलं काही ठेवत नाही आणि देवांना कसं वाटेल असं बरंच बोलत राहीला.भाषा पोचत नव्हती भावना समजत होत्या. मला चहा अर्थातच आवडला आणि मी बाहेर जाऊन अजून एक चहा मागितला आणि त्याला मस्त चहा झालाय असं चक्क मराठीत सांगितलं आणि ते पोचलही तसं तो लगेच ,’स्पेशल टी तिरुवन्नमलै’ असं म्हणून खुश झाला आणि मला अजून एक स्पेशल चहा दिला.मी त्याला मराठीतच काही प्रश्न विचारले त्यावर त्यानं त्याला समजलेलं होतं तशी उत्तरं दिली.चहाची पावडर ठेणीहून आणता का?किती प्रमाण आहे?दुध कोणतं वापरता? इथपासून तिरुवन्नमलैची वस्ती किती आहे? तुम्ही कुठे राहता,मालक कुठे राहतात, तुम्ही कधीपासून इथे कामाला आहात.किती वेळ काम करता,दिवसा कोणी वेगळा माणूस तुमची जागा घेतो का?रोज साधारण किती चहा विकला जातो असे प्रश्न एकामागून एक विचारल्यावरही तो अतिशय अजिबात न वैतागता शांतपणे उत्तरं देत होता. मी चहा संपवून मालकाला पैसे दिले.किती झाले वगैरे सांगितलं त्यानी पण मला समजलंच नाही. अशा वेळी मी शंभराची नोट देतो आणि जे उरतात ते आपले असं समजतो. एकदाही मला कोणी फसवलं आहे असं घडलं नाहीये.जाता जाता मालकानी मला अजून एक बिस्कीट देत. एग्ग इल्लै असं सांगून परत कानाला हात लावले. सहा कधीच वाजून गेल्याचं जाणवलं आणि मी माझं सामान घेऊन आश्रमात जायला निघालो.
आश्रमातले काका सहा म्हणजे सहा वाजता हजर झालेले. त्यांनी माझ्याकडे कधी खोली बुक केली,कुठून केली,किती दिवसांसाठी केली अशी प्राथमिक चॉकशी केली. सदर गृहस्थ अतिशय काटेकोर होते हे त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून सहज समजत होतं. सत्तरीचे ते गृहस्थ हिरव्या लुना गाडीवरून बरोबर सहा वाजता आलेले. स्वच्छ पांढरा शर्ट आणि एक ठेवणीतली धोती असा त्यांचा पेहराव होता.कपाळावर तसंच काटेकोर गंध लावलेलं खिशातल्या स्वच्छ पांढऱ्या रुमालानी त्यांनी चष्मा पुसत आपल्या रजिस्टरमध्ये माहिती भरायला सुरवात केली.तोपर्यंत मी उभाच होतो त्यांनी बसायची खूण केली.माझ्याकडून पैसे घेतले आणि पावती देऊन खोलीची चावी देता देता, डे आफ़्टर टुमॉरो शारऽऽऽप्प सेव्हन एम चेकआऊट असं बजावलं. यांच्याकडून थोडातरी काटेकोरपणा घ्यावा असा विचार आला.मी त्यांना धन्यवाद देत सामान घेऊन माझ्या खोलीकडे रवाना झालो.
फक्त आपण जिथे जाणार आहोत तोच भाग महत्वाचा नसतों. म्हणजे बॅंगलोरला पोचल्यापासून तिरुवन्नमलैचा प्रवास वैविध्यपुर्ण घटनांचा एक चित्रपटच होता. वेगवेगळी लोकं दिसली,भेटली,वेगवेगळी ठिकाणं पाहिली, भडक रंगाच्या बस पाहिल्या,विचित्र पत्ता सांगणारे बॅंगलोरचे तिरसट दुकानदार पाहिले, हजारो दुकानं पाहिली,डोंगर पाहिले,बसचा सतत येणारा आवाज कान देऊन ऐकला.ड्रायव्हरच्या स्वभावाचा अंदाज घेतला.शेकडो लोकांचे विचार काय असतील याचा एक अंदाज घेतला.शेजारच्या सहप्रवाशाची झोप पाहिली.तामीळ चहा अगदी चवीनी प्यायला.चित्रपटांच्या जाहीरातींच्या स्पर्धा पाहिल्या,तो पत्ता सांगणारा गूढ माणूस कोड्यात टाकून गेला. तगरीच्या झाडामध्ये लपलेलं एक मिणमिणता दिवा लागलेलं घर पाहिलं. अतिशय कुशल चहावाल्याशी मैत्री झाली.काटेकोर माणूस भेटला. या सगळ्याला प्रवास म्हणतात.
यात खरी गंमत आहे. ठिकाणापेक्षा ठिकाणाला पोहोचण्यात खरी गंमत आहे असं का म्हणतात हे अशा वेगवेगळ्या प्रवासात दरवेळी अनुभवायला मिळतं. हे सगळं जगायला मिळणं यासाठी नक्कीच पुण्य पाहिजे नाहीतर असं चित्रपटासारखं सगळ्या भावना एकाच प्रवासात अनुभवता येणं दुर्मीळच. श्रीमंत असण्याचं हे एक लक्षण मी समजतो.प्रवास…………..

खूप छान!!
Thank you Gauri!
खुप सुंदर वर्णन.. वाचताना प्रत्यक्ष अनुभवल्याचा भास होत होता.
Thank you!