कोरोना विषाणूचे प्रताप बघायला मिळाले पण त्यामुळे माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार आला.
कोरोना विषाणूचे स्वरूप काय आहे ?
चराचरात भगवंत आहे असं आपण म्हणतो मग कोरोना विषाणूही त्या भगवंताचं रूप आहे का ?
मुळात चराचर म्हणजे काय ?
आपण हे शरीर म्हणजे आपलं अस्तित्व असा समज करून घेऊन बाकीच्या गोष्टींची संगती लावायचा प्रयत्न करतो आणि सध्या समाजात कोरोना विषयी जे काही मतप्रवाह आहेत ते याच एका विचारातून आले आहेत असं लक्षात येतं.
कोरोना विषाणू म्हणजे एखादा बाह्य घटक आहे जो आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि आपण (शरीर) आजारी (?) पडतो असा सर्वमान्य समज आहे.
पण जरा खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येतं की कोरोना बाह्य घटक आहे हाच मुळात अयोग्य समज आहे.
कोरोना आपलाच एक अविभाज्य भाग आहे असं एकदा निदान विचारांनी तरी मनात आलंय ?
का येईल ?
आपल्या मनात चुकीचे समज इतके घट्ट रुजलेत की आपण त्याच्या थोड्याफार वेगळ्या मतप्रवाहाला तात्काळ रद्दबातल करतो.
माझी चेष्टा करा, मला नावं ठेवा, मला असं म्हणा तुझं बरोबर आहे पण यानी काय होणारे ?
सगळं मान्य आहे पण तरीही मी माझं मत मांडायचं काम करणार आहे.
तर जेव्हा शरीर म्हणजे आपण हा विचार एक सेकंद घालवला कि लक्षात येतं की जग असं काही आपल्या विचारांपेक्षा निराळं नाहीये.
आपण फक्त जगाचं ‘मेमरी’ या स्वरूपात आकलन करत आलोय आणि शरीर सोडून हे जग कसं आहे हा विचार अनेक दालनं खुली करतो.
मग या विचाराचं अनुभवात रूपांतर होतं तेव्हा लक्षात येतं की कोरोनाच काय या जगातली प्रत्येक गोष्ट, हो अगदी संडासातला बॅक्टेरीया, माशी, हत्ती, घोडे, पक्षी झाडं धूळ इतर माणसे हे सगळे फक्त आकार आहेत त्यांचं अस्तित्वही आपण ‘शरीर’ या मर्यादेशी जोडल्यानी तसंच समजत आलोय.
पण ‘ते’ आणि ‘आपण’ यांच्यात आपण भेद समजतो तो फक्त शरीराच्या चोकटीमध्ये आपलं अस्तित्व मोजल्याने.
वास्तविक आपण आणि वरचे सर्व घटक यांमध्ये कसलाच भेद नाही.
आपणच बॅक्टरीया आहोत आणि आपणच हत्ती आहोत
कुत्रा आपल्यातूनच भुंकतो पक्षी आपल्यातून ओरडतात
कोरोना आपलाच अविभाज्य भाग आहे
कोरोना बाहेरून आला असं समजणं चुकीचं आहे कारण ‘बाहेर’ ‘आत’ या गोष्टी शरीर या मर्यादेशी आपलं चुकीचं नातं जोडल्यानी तयार झालेल्या गल्लतीचा परिणाम आहे .
मग तसं असेल तर जी शरीरं कोरोनानी नष्ट होत आहेत, ज्यांना सर्दी खोकला ताप न्यूमोनिया होऊन व्हेंटिलेटर वर ठेवलं जात आहे त्यांचं काय ?
ते डोळ्यांदेखत आजारी पडत आहेत मरत आहेत श्वास घ्यायला त्रास होत आहे ऑक्सिजन अभावी जीवाची घालमेल होत आहे हे सगळं कसं घडतंय ?
वर जे लिहिलंय त्याप्रमाणे या सगळ्याची संगती कशी लावता येईल?
आत्ता हे लिहीत असताना मी इयर फोन वर गाणी ऐकत आहे.
एक सेकंद इयर फोन बाजूला ठेवला आणि गाणं बंद झालं.
गाणं बंद झालं ते माझ्यापुरतं, प्रत्यक्षात ते सुरूच होतं.
आपण शरीर ही जाणीव संपली की वरील प्रश्नही आपोआप संपलेले आढळतील.
कसे ?
वरील सर्व अवस्थांमध्ये एकच समान धागा आहे.
शरीर.
आपण कोण आहोत?
शरीर?
मन ?
विचार ?
का त्याही पलीकडे काही आहे ?
ही माहिती एकदा मिळाली आणि ती अनुभवानी समजली की शरीराशी असलेलं आपलं नातं हे हॉटेल मधल्या खोलीचं तिथे राहत असलेल्या माणसाशी असेल तसं आहे हे लक्षात येतं आणि भीती तात्काळ निघून जाते.
भीती म्हणजे काय ?
आपलं शरीर नष्ट होऊन आपलं अस्तित्व संपेल ही भावना.
एकदा शरीर म्हणजे आपण नाही हे पक्कं झालं की ती भावना तरी मनात कशी येईल ?
।। शुभं भवतु ।।

Different thoughts as always??
Thank you very much Ani…