सजीव म्हणजे ज्यामध्ये जीव आहे असा प्राणी. मग तो ठराविक हालचाली करणारा ठराविक आकाराचा असावा असं काही बंधन निसर्गात पाहायला मिळत नाही. ज्यात जीव तो सजीव.
प्रत्येक जीव हा त्या त्या आकारात त्या त्या स्वभावाचा होण्यामागे काय प्रेरणा आहे याचं मला कोडं होतं आणि ते कोडं या एका जीवानी सोडवलं.
कॉलेजनंतर आयुष्यात काही अनुभव आले आणि त्यानी ज्यासाठी आपला जन्म झालाय त्याचं कारण समजलं तसंच इतरांचा जन्म का झालाय, इतर जीव का जगतात त्यांचं आयुष्य जसं आहे तसं ते का आहे याची कारणं सापडली मग ती तर्काला धरून आहेत का याचा अभ्यास झाला आणि असं लक्षात आलं की आपण ज्याला इतकं महत्व देत असतो तो तर्क अतिशय निरुपयोगी आणि कदाचित नुकसानकारकच आहे. तर्कानी एक मोठेपणा येतो एक समाधान मिळतं ज्यानी आपला अहं जपला जातो अगदी बेमालूमपणे.
तर्क जितका लवकर सोडता येईल तितका सोडला पाहिजे ही अक्कल, तर्क जिथपर्यंत जाऊ शकेल आणि एका मर्यादेच्या पुढे तो थांबेल तिथपर्यंत पोहोचल्यावर आली.
तर,सजीव आणि निर्जीव या व्याख्या आपण तर्काने समजून घेतो आणि रोजचा व्यवहार त्याच तर्काला धरून होत असतो पण कधीतरी अशी वेळ येतेच आयुष्यात जेंव्हा आपल्याला जाणवतं आपले सगळे व्यवहार हे मनाच्या आधीन असतात. मन एक सेकंद नष्ट झालं/केलं तरी आपला या जगाकडे पाहायचा अनुभव बदलेल.
झोपेत आपल्याला सजीव आणि निर्जीव याचं ज्ञान नसतं तेंव्हा आपल्या सो कॉल्ड शरीराचा ताबा ज्याला आपण ‘मी’ असं म्हणतो त्या ‘सजीव एन्टीटी’ कडे नसतो हेही आपल्याला समजत नाही आणि आपण इतक्या मोठ्या चमत्काराविषयी कदाचित संपुर्ण आयुष्य अनभिज्ञ असतो.
खरं तर आपण फक्त जगतोय. का? कशासाठी? याची उत्तरं आपल्याजवळ नाहीत आणि एखाद्या भरकटलेल्या वासरासारखी आपली फक्त धावपळ सुरू आहे.श्वास सुरू आहे. शरीर धावत आहे. इतकंच. ‘मी’ पाहिलं, मी धावलो, मी रडलो हे सगळे उद्योग दिवसा आपण शरीराला जोडून मोकळे होतो पण झोपत हेच शरीर आपल्याला सोडून जातं याचं भानही आपल्याला सकाळी राहत नाही. ते रात्रभर कोण सांभाळत होतं कोणाच्या इच्छेनी आपण झोपलो,झोपेत आपले श्वास आपल्या वतीनं कोण घेत होतं? आहेत याची उत्तरं?
आत्ताही आपण टिमकी मिरवत म्हणू ‘मी श्वास घेतला.’ ज्याला असं वाटत असेल त्यानी
असंच ठरवून झोपेत श्वास घेऊन दाखवावा.आहे शक्य?
अजिबात नाही. कारण ही सगळी व्यवस्था आपण अतिशय डळमळीत तर्कावर रचलीये आणि असे काही अनुभव आले की ती सगळी यंत्रणा कोलमडते आणि त्यामागे जी खरी व्यवस्था आहे ती पाहायला मिळते.
खरी व्यवस्था अशी आहे की आपण ज्याला शरीर समजतो तो एक आपल्या मनाचा विचार आहे. त्यापलीकडे त्याचं अस्तित्व आहे असं ज्याला वाटत असेल तो अज्ञानात जगतोय असं समजावं.
आपलं मन हे असंख्य विचारांचं संकलन आहे. आपण एक एक विचार करतो त्या सगळ्याचा संग्रह म्हणजे मन.विचार मनात येतात मनात विरतात. आपण ज्याला काही वस्तु पदार्थ समजतो तेही प्रत्यक्षात विचारच आहेत पण ते एखाद्या विचाराचं मूर्त स्वरूप आहे. जसं गणपतीची मूर्ती म्हणजे गणपती बनवायच्या विचाराचं मूर्त स्वरूप. ‘मूर्ती’. ती बनवावी असा विचार न येता मूर्ती बनेल? शक्यच नाही.
जगात जरा तर्क बाजूला ठेऊन पाहिलं तर लक्षात येतं प्रत्येक आकार हा एक विचारच आहे त्या पलीकडे त्याचं अस्तित्व नाही. जर असेल तर तो अज्ञानाचा भाग आहे. आपण जे बघतो ते विचार आहेत.जे ऐकतो ते विचार आहेत. प्रत्येक इंद्रीय आपल्याला फक्त हे विचार पुरवतात.संवाद साधायला मदत करतात. शरीर हा एक मूर्त स्वरूपात तयार झालेला विचार आहे त्यामूळे विचारांना जे नियम आहेत ते सगळे शरीराला लागू पडतात. शरीर तयार होतं,वाढतं,विरतं.
झोपेत विचार असतात तेंव्हा शरीर हा विचार नसतो. सकाळ झाली की शरीराशी नातं जोडलं जातं. हा झोपेतला काळ चमत्कारीक असतो कारण तेंव्हा आपण सत्याच्या जवळ असतो.
झोपेत आपलं शरीर कोण सांभाळतं याचं उत्तर शोधलं (तर्कानी नव्हे) की सगळेच प्रश्न सहज सुटतात.
आपलं शरीर जसा एक विचार आहे तसा जगातला प्रत्येक सजीव आणि निर्जीव आकार हा एक विचारच आहे. जे नियम आपल्याला लागू तेच त्यांनाही लागू होतात. इथे फक्त तीव्रतेचा फरक आहे. काही प्रांण्यांना फक्त काळं पांढरंच दिसतं त्यांना रंगांच ज्ञान नसतं,तर काही जीव आपल्या उपजत संवेदनांवरच जगतात.काही जीव तर फक्त काही तास जगतात आणि लगेच विरतात.
असे अब्जावधी जीव आणि निर्जीव गोष्टी सतत नव्यानी तयार होऊन परत विघटीत होण्याची क्रिया सुरू आहें लक्षात येतं. झोपेत या अब्जावधी घटकांविषयी किंचीतही जाणीव आपल्याला नसते.
आपण सरळ आहोत का वाकडे आहोत याचं भान नसतं,वेळेचं भान संपुष्टात येतं आणि आपल्याला जे एक गोष्ट केल्यावर त्याचा परिणाम म्हणून दुसरी गोष्ट घडते हे ज्ञान उपजत असतं तेही झोपेत नष्ट होतं.
हा फोटो मी अर्थातच जागेपणी काढला कारण मला यात एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली.
यातला कोळ्याचा आकार आणि ती भिंतीला पडलेली भेग या फक्त रेषेसारख्या दिसत आहेत.
दोन सारखे आकार
एक सजीव एक निर्जीव.
सजीव आकार निर्जीव आकारापेक्षा जास्त उन्नत आहे,सक्षम आहे.त्याचं मागचं कर्म तो त्या आकारात येऊन भोगतोय.एक दिवस तो हा आकार सोडणार आहे. आपल्या कर्माप्रमाणे नवीन आकार धारण करणार आहे.ती भेग एक दिवस विरणारे,दुसरा आकार धारण करणारे,परत नष्ट होणारे.
दोन्ही आकारांचं भविष्य सारखंच.
तीव्रता निराळी,परिणाम एकच.
हा फोटो असा पाहिला तर लक्षातच येत नाही हा एक सजीव आहे.याचं कारण आपल्या मनात तयार झालेली आकारांची यादी.ही यादी प्रचंड मोठी आहे आणि त्यातले काही काही जीव तर आपोआप आपल्या नकळत त्या यादीत शिरले आहेत.तर आपल्या त्या यादीचा आपण संदर्भ घेतो आणि आपला व्यवहार करत असतो.त्या यादीबाहेर एखादा अनुभव आला तर मात्र मनाची तारांबळ उडते आणि यादी कायम अपडेट होत राहते.
मला कोळी आणि भिंतीच्या रेषेचा समान धागा पाहायला गंमत वाटली म्हणून हे लिहावसं वाटलं.
एकदा ही यंत्रणा समजली की रेष काय किंवा कोळी काय सगळेच लटकी रुपं असलेले भासतात.
त्यामागे जे आहे त्याकडे आपोआप लक्ष दिलं जातं आणि तो कोळी आणि रेष त्या कोळ्याच्या जाळ्यासारखंच आपलाच एक अविभाज्य भाग आहेत याची खात्री पटते.
ही यंत्रणा समजून घ्या,कायमचे सुखी व्हा.
शुभं भवतु।
