वारी,विठ्ठल,मी…….

स्वरांची ओळख झाल्यापासून वेगळ्या वेगळ्या लेव्हल्सवर ‘आवाज’ अनुभवले जातात. स्वर म्हणजे एक फ्रिक्वेंसी. ती कुठेही ऐकायला मिळाली की तो स्वरही ऐकू येणारच. कधी फ्रिजचा आवाज तंबोऱ्याचा शुद्ध मध्यम बनतो तर कधी मिक्सर त्या आवाजात मिसळतो.  आज आषाढी एकादशी निमित्त लिहावसं वाटलं. माऊली, तुकोबांसाठी अवघा रंग एक झाला अवस्थेत वारी पुर्ण करत त्या विठोबाच्या पायाशी विठोबा बनून लीन होत असावेत. लीनतेची भावना माणसाला बरंच काही शिकवून जाते. मला स्वरांची जुजबी ओळख त्याच भावनेनी झाली असावी. स्वरांची वारी जेंव्हा पहिल्यांदा केली तेंव्हा हे स्वरांचं  विश्व प्रत्यक्ष दिसलं. माझा स्वरांशी संबंध ‘बासरी’ या माध्यमाद्वारे आला त्यामूळे आपोआप बासरी शिकण्याकडेच कल राहीला पण जेंव्हापासून ही वारी सुरू केली तेंव्हापासून हे स्वरांचं माध्यम बाजूला झालं आणि साक्षात ते स्वर समोर आले. या सगळ्या प्रोसेसचा मी लावलेला अर्थ असा होता की माध्यम तुम्हाला बाह्य आनंद मिळवून देतं पण त्याला प्रचंड मर्यादा आहेत. माध्यम हे काहीतरी ध्येय प्राप्त करण्यासाठी एक मार्ग आहे त्याकडे तशा मर्यादित विचारानी बघितलं तर त्याद्वारे जे दिसतं, जे समजतं ते अतिशय भव्य असतं. तो बाह्य आनंद हा काही वेळापुरता ठीक वाटतो (आपलं माध्यमावर प्रभुत्व दाखवायची हौस) पण खरं संगीत हे शांततेत अतिशय आत दडलेलं आहे हे समजलं की ती हौस आपोआप कमी होते आणि त्यात मन रमत नाही. शांतता हे या स्वरांचं अंतिम स्थान आहे. तेच ध्येयही आहे. स्वरांचा आनंदच मुळात शांततेमुळेच अनुभवता येतो. शांतता म्हणजे आवाजाचा अभाव नाही, तर त्या लीनतेची परमोच्च अवस्था. माध्यमाद्वारे हे सगळं अनुभवायचं असल्याने माध्यम शिकावं लागतं यात वाद नाही त्यासाठी सराव एक गोष्ट परत परत करायची तयारी ठेवावी लागते (तानबाजी,पल्टे इ.) पण एकदा तुम्हाला स्वर समजले की या माध्यम आणि त्याच्या तयारीची आवश्यकता अगदी थोडकी राहते.
एकदा तो ‘सा’ दिसला की मग बाकी काही शिल्लक आहे असं वाटेनासं होतं जे वाजवू ते आपोआप त्याच परिघात जाऊन मिळायला लागतं. ही मर्ज होण्याची प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे. जसं वारीची परमोच्च स्थिती विठ्ठल होणे आहे तसं या वारीची परमोच्च स्थिती तो स्वर होणे आहे. एकदा तो स्वर तुम्हाला भेटला, तुम्ही त्यात लीन झालात की मग बाकी दाखवायचं संगीत आनंद देऊच शकत नाही. तुम्ही सदैव त्याच स्वरायला भेटायला जाणारच मग तुम्ही किती वेळ रियाझ केला किती वाजवलं गायलं हे दुय्यम ठरतं.
माझी वारी एक स्वर वाजवून परत त्यात मिसळून पुर्ण झाली त्या एका क्षणाला मी सा झालो.
माझी वारी पुर्ण झाली.

ही अशीच माझी वारी
आणि हाच ‘सा’ माझा विठ्ठल