6.प्रदक्षिणा…

अतिशय शांत मन एका वेगळ्यात भावविश्वात घेऊन जातं आणि त्यामध्ये शरीराचं भान तसं कमी असतं,आसपासच्या वातावरणाचंही फारसं तारतम्य जाणवत नाही.तशाच स्टेटमध्ये ज्या रस्त्यानी आलो त्या रस्त्यानी परत राहायच्या ठिकाणी जे उपाहारगृह होतं तिथे जायला निघालो. पाचही इंद्रीयं तशी चाचपडतच मनाला संदेश देत होती त्यामूळे आजूबाजूला फिरणारी माणसं, त्यांचे चेहरे,हालचाली हे सगळं न दिसता फक्त हालणारे आकार दिसत होते. सगळे आवाज क्षीण होऊन गेलेले त्यामुळे गाड्यांचे आवाज,हॉर्नचा आवाज,माणसांची बडबड जवळपास ऐकूच येत नव्हती.दिसण्यावरही मर्यादा आल्यामूळे समोर धुसरच रस्ता आहे इतपतंच संदेश मनाला मिळाला.
मनात कमीतकमी विचार होते,इतर इंद्रियांची धावपळ कमीतकमी होती,स्थळ,काळ आणि कार्यकारणभाव एक झाल्यासारखे वाटले.काहीतरी सुखकारक घडल्यासारखं जाणवत होतं.
तसाच त्या उपाहार गृहात पोहोचलो त्यानंतर तिथल्या वासांनी माझ्या मनाची ती अवस्था संपवली आणि मला त्या वासांमध्ये जाऊन बसवलं.भूक लागलेली पण माझ्याकडून काही बोललंच जात नव्हतं हे पाहून मालकानी मला जवळपास हटकलंच.दहीभाताची ऑर्डर देऊन मी माझ्याच विचारात गढलो.दिवसभरात आलेल्या अनुभवांची उजळणी करत करत एकीकडे दहीभात संपवला आणि कॉफी मागीतली.दहीभातावर कॉफी पिणारा मी एकटाच असीन कदाचीत.पण त्या वेळी त्या क्षणाला कॉफीचा मोह आवरला नाही.प्रत्येक क्षण मोजण्याचं माझं चहा कॉफी हे एकक आहे त्यामूळे मला बरेचसे चांगले क्षण हे चहा कॉफीनी मोजण्याची सवय लागली आहे.माझं म्हणणं अशी सवय ज्यांना आहे त्यांना लगेच समजेल.ते नाही का तेव्हा त्या टपरीवर चहा प्यायला तो किस्सा,किंवा रात्री फिरायला बाहेर पडलो आणि आपल्या नेहमीच्या टपरीवर कॉफी प्यायली रात्री ३ वाजता तेंव्हा घडला किस्सा अशी निरनिराळ्या प्रसंगांची एक यादीच या चहा कॉफी भोवती जोडली गेली आहे ती तशीच आठवण्यात मजा आहे.त्यातून चहा कॉफी काढले की मजाच संपली.
अरे तो सलग बारावा चहा प्यायलेला पहाटे कराड जवळ तिथून पुढे गेलेलो कोकणात भर मध्यरात्री एका वेड्या पावसाळी वाटेनी.
यातून चहा कसा काढावा?मीठ काढून घेण्यासारखं आहे पदार्थामधलं.तो काढायचा विचार केला तरी मला त्या गारठून लाकडासारख्या झालेल्या हातांची आठवण येईल.
तर ही कॉफी माझ्या त्या दिवसातल्या प्रसंगांना एककात गुंफण्यासाठी मागवली,
कॉफीभोवती सगळा दिवस व्यवस्थित मांडून झाल्यावर लक्षात आलं त्या दिवशी मला एकदाही वेळेचं भान राहीलं नाही,स्थळाचं भान राहीलं नाही.कार्यकारणाचं भानही मी माझ्या शहरात विसरून आल्यासारखं वाटलं.जिथे वेळेचं भान असतं,आपण या सो कॉल्ड जगात ‘जागा’ व्यापतो किंवा तशी कल्पना करतो ती भावना आणि जे आपण करू त्याचा परिणाम आपल्याला भोगायचाय ही कल्पना या तीनच गोष्टी आपल्याला एका बंधनात ठेवत असतात.मी पुण्याहून निघालेला एक काही फुट उंचीचा काही ठरावीक आकार धारण केलेला जीव काही तासांचा प्रवास करून काही तास एका शहरात घालवतो आणि तिथे अशा गोष्टी करतो ज्या त्याला परिणामांचा हिशोब मागत नाहीत.खरं खरं स्वातंत्र्य हेच नाहीये का?स्वैराचार म्हणजे या तीन गोष्टीत अडकून केलेल्या स्वातंत्र्याच्या गप्पा.पण पहाटेपासून जे क्षण जगलो ते खरे ‘क्षण’ नव्हते का?त्याचं कारण मी त्यामध्ये ‘मी’ नव्हतो. फक्त एक ‘प्रवासी’ होतो. प्रवाशाला कसला आलाय कार्यकारण भाव,कसली वेळ आणि स्थळ.प्रवासी येतोच भुतकाळ मागे टाकत वर्तमानाला भोगत भविष्यकाळ बदलायला.किती सोपं आहे असं प्रवासी बनून जगणं.पण आपल्याला जन्माला आल्यावरच या बंधनात अडकवलं जातं.जन्मवेळेची नोंद आपल्याला घड्याळाच्या काट्यात अडकवते.त्या आकाराला नाव देऊन त्याला एक मर्यादा लादली जाते.त्यानंतर त्याला हे असं करशील तर असं होईल.दंगा केलास तर बाहेरून राक्षस येईल असं सांगून हळू हळू बेमालूमपणे अडकवलं जातं.त्यामूळे त्याला तू प्रवासी आहेस हे सांगण्याची कोणाचीच हिंमत होत नाही कारण जे शिकवतात तेही त्याच एका सार्वत्रिक फसवणूकीचे बळी असतात.त्यांनाच स्वतःला आपण कोण आहोत याचा विसर पडलेला आहे.ते या प्रवासाला प्रवास न म्हणता ध्येय समजतात त्यात काय नवल.जे असा प्रवास करत असताना आपसूकच समाजापासून टोकाचे विचार गाठले जातात.जे चार जणं करत नाहीत ते सगळं निराळं बनतं.त्याच्याकडे उपहासानी किंवा आश्चर्यानी पाहिलं जातं.प्रवासी या सगळ्या मान्यतांना भिक घालत नाहीत कारण त्यांना या सगळ्यानी काडीचाही फरक पडत नसतो.पण मला आज ही जाणीव झाली की मला प्रवासी म्हणूनही जगायचं नाहीये. याचं कारण तोही एका बंधनाचाच प्रकार आहे नाही का? थोडा प्रगत तरी पण एका बंधनाला आमंत्रण देणारा. प्रत्येक अनुभवाला प्रवासी एका नजरेनी साक्षी भावानी पण त्यात ते त्याच ‘असणं’ राहीलेलं असतं. मला जगायचंय ते जो अनुभव घेऊ तो अनुभवच बनून.मी पावसात भिजलो तेंव्हा निसर्गातली ती लय बनलो तेंव्हा माझ्यातला मी जवळपास नष्ट झालेलो. मीच तो संपुर्ण अनुभव बनलो. असं आयुष्य मला जगायची इच्छा आहे ज्यात हे असे अनुभव पुरेपूर असतील.आणि माझ्यातल्या प्रत्येक कणाला फक्त तो अनुभवच बनून तोच अनुभव भोगायची संधी मिळेल. प्रवासी प्रवास करतो पेक्षा प्रवासी प्रवास होतो. हेच खरं जगणं नाही का?
पैसे देऊन बाहेर जरा चक्कर मारायला निघालो.
अगदी साडेआठलाही बाहेर रस्त्यावरची गर्दी तशी संपलीच.तुरळक बाहेरगावच्या गाड्या सोडल्या तर लोकांची येजा पुर्णपणे थांबली.शेजारच्या आश्रमातून बाहेर येणारी काही तुरळक माणसं सोडली तर बाकी दुकानांमध्ये तशी गर्दी नव्हतीच.
आश्रमातून बाहेर आल्यावर उजवीकडून मुख्य आश्रमापर्यंत गेल्यावर पहाटे गिरीवलम करायचा विचार अचानक आला आणि तसाच उलट फिरून सरळ झोपायला गेलो.

झोपताना लावलेला ३.३० चा गजर वाजला आणि त्या आधीच जाग आलेली हे समजलं.गजर कधी वाजतोय याच विचारानी जाग आली असावी.पंख्याचा घर घर आवाज येत होता.बाकी तशी शांतता होती.३.३० चा गजर जर घरी लावला असता(अपवादानीही असं कधी घडणार नाही) तर तो १० वेळा तरी स्नूझ केला गेला असता. पण आज शहाण्यासारखं गजराच्या आधी उठल्यामूळे उत्साहानी आवरायला घेतलं.इतक्या पहाटे चक्क गार पाण्यानी आंघोळ केली आवरलं आणि माझं पाकीट मोबाईल थोडे पैसे घेऊन दारात आलो आणि बूट घालावे का नाही या विचारानी एक सेंकंदच मनात संभ्रम तयार झाला. इतक्या वर्षांत माझ्या मनानी या असल्या सगळ्या कर्मकांडांवर विश्वास ठेवणं बंद केलंय.देवळात जाणे,जप इ. गोष्टी आणि इतर कोणत्याही सामान्य गोष्टी यात अंतरच वाटेनासं झालंय त्यामूळे आंघोळ करूनच गिरीवलम केलं पाहीजे अनवाणी चालतच केलं पाहीजे वगैरे गोष्टींवर माझा विश्वास अजिबात नाहीये. मुळात या सगळ्या अटी भितीतून जन्माला येतात असं पाहायला मिळालंय त्यामुळे त्या इतक्या अदबीनं पाळल्या जातात. अमुक एका देवाला अमुक एका दिवशी तेल वाहिल्यावर ती देवता प्रसन्न होते इतपत मी समजू शकतो पण अमुक एका देवाला जर तेल वाहीलं नाही तर मात्र काही खरं नाही हे माझ्या मनानी साफ झुगारायला सुरवात केली.जो देव घाबरवतो किंवा ज्या देवाला घाबरा असं सांगितलं जातं ती देवता माझ्यासाठी देवताच नव्हे.देव एक डिफेन्स मेकॅनिजम आहे त्यामुळे देवाला लोकं एक कंफर्टींग एलिमेंट म्हणून पाहतात.तीच देवता त्याच लोकांच्या वाईटावर उठली तर ती देवता तरी झूट आहे किंवा त्या देवतेला प्रोमोट करणारे तरी फसवे आहेत.हे सगळं विश्लेषण काही वर्षांपुर्वीचं आहे. तेंव्हा विश्लेषणाची गरज असायची. हे असं असं का? या विचारानी फार त्रास व्हायचा. एखादा माणूस इतका हेल्पलेस इतका चीड यावी इतका रडून रडून देवाकडे गाऱ्हाणं का मांडतो , देवही जर असला तर तो इतका निष्ठूर कसा काय जो माणसाला इतकं आगतीक बनवतो. स्वतःचं अस्तित्व विसरून काम करणं वेगळं आणि आपला आत्माच गहाण ठेऊन अशा भिका मागणं याचं उत्तर,या मागची भुमिका शोधायचा प्रयत्न व्हायचा. ही सगळी विषमता, हे सुखदुःखाचे बदलणारे अन्यायी निकष,दैन्य,उपासमार,दारीद्र्य,विवंचना,फसवणूक,अत्याचार,बलात्कार,आत्यंतीक द्वेष,क्रोध या सगळ्यानी मनाला नास्तीक विचार आपलेसे वाटले नाहीत तरंच नवल होतं. त्याही डबक्यात काही काळ लोळून झाल्यावर लक्षात आलं हे काही समाधान नाही. आपली भुमिका नास्तीक झाली म्हणून हे सगळे आगतीक,दीनवाणे,क्षीण झालेले थंड जीव बदलणार नाहीयेत. बदलत नाहीतच. उलट या सगळ्याची जास्त चीड यायला लागते आणि आपण त्यावर काही करू शकत नाही याचा जास्त त्रास करून घेतला जातो. नास्तीक होणं म्हणजे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपण फक्त डोळेझाक करत असतो. तसा विचार केला तर आपली या बाबतीतली भुमिका बदल नक्की घडवते पण ती निश्चीतच पुरेशी नसते जर संपुर्ण जगाचा विचार असेल. आपल्याला अहंभावामुळे वाटत असतं आपल्या भुमिकेच्या असण्यानी फार मोठी उलथापालथ होत आहे. आपण एखादी भुमिका स्वीकारत आहोत यासाठी फार मोठी योजना आखली जात आहे वगैरे गोष्टी कथांमध्ये खऱ्या असतात. प्रत्यक्षात आपण अगदीच किरकोळ आहोत. आपल्याला फार कोणी महान समजणारे आपणंच आहोत त्यामुळे आपण नास्तीक आहोत का आस्तीक यानी जगाचा कारभार चालत नाही हा एक साक्षात्कार नास्तीकतेचा पर्दाफाश करणारा ठरला आणि मी त्या दलदलीत जाण्यापासून वाचलो.प्रत्यक्षात नास्तीकतेनी मला हे शिकवलं की आपल्याला ज्या गोष्टीचा संताप आला आहे ती ही व्यवस्था नाहीचे तर आपल्याला मनाचं समाधान करून देणारी उत्तरं या व्यवस्थेत मिळत नाहीयेत ही खंत आपल्याला अशा अतिरेकी पण क्रांतीकारी विचारांकडे ओढत आहे.जर ही उत्तरं मिळाली तर आपली तडफड कायमची बंद होईल या विचारानी मग त्या उत्तरांचा शोध सुरू झाला. नंतर काही वर्षांनी अचानक एक दिवस उत्तर मिळालं.उत्तरं नाही उत्तर. मग मनाला शांतता मिळाली आणि त्यानंतर हे असं विश्लेषण बंदच झालं. अनवाणी चालायचं ठरलं कारण मला गिरीवलम ही कल्पनाच खरं तर विनोदी वाटत होती. चालणं होईल आणि एका लेखकाचं एक वाक्य आठवल्यामुळे मी अनवाणी जायचं ठरवलं.
If you’re going to do something wrong, do it right.
कुठल्या लेखकाचं वगैरे नाही एका इंग्लीश सिरीअल मधलं हे वाक्य आहे पण मला ते आवडलं आणि तसंच ते वापरायचं ठरवलं. साधारण ४ वाजता मी तिथून निघालो आणि आश्रमाबाहेर पडलो.

या आश्रमात जो रखवालदार होता तो हजार दोन हजार डासांच्या गराड्यात अतिशय शांतपणे झोपलेला होता.मोठं दार जरी बंद असलं तरी एक छोटं दार दिसलं त्याला फक्त कडी लावलेली.त्या बिचाऱ्याची झोपमोड होऊ नये अशी काळजी घेत मी तिथून हळूच सटकलो.बाहेर आलो आणि लक्षात आलं माझा चहावाला मित्र तर तिथे अगदी उत्साहात चहाची तयारी करत होता.त्याच्याकडे न थांबता पुढे जाणं ही कल्पनाही करता आली नाही आणि तिथे थांबून मस्त एक चहा प्यायचा ठरवला.भल्या पहाटे त्यानी चहाचं दुकान का सुरू ठेवलं या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारखे दोन तीन चहाप्रेमी आल्यावर आपोआप मिळालं. कालच्या पावसाचा परिणाम आजही वातावरणात टिकून होता. गारवा असल्यामूळे चहा प्यायलाही मजा येणार हे त्यालाही जाणवलं असणार कारण आमच्या बरोबर त्यानीही एक पेशल चहा स्वतःसाठी बनवला. चहावाल्यांचा चीअर्स सारखा एखादा संकेत असता तर तो आम्ही त्यावेळी सगळ्यांनी निश्चीतच केला असता.चहा गरम असल्यानी कपांवर कप तर आदळून चालणार नाहीत.काहीतरी वेगळी शक्कल लढवून हा संकेत लवकरात लवकर अमलात आणायला हवा. माझ्या मित्रानी मला गिरीवलम ला जातोय का? असं विचारलं आणि मी होकार देत त्याला पैसे दिले.ते घेत त्यानी मला काही महत्वाच्या सुचना दिल्या. पहिली अर्थातच रस्त्याच्या डावीकडून चालायची. दुसरी म्हणजे वाटेत जी महत्वाची मंदीरं आहेत तिथे नक्की जायला त्यानी सांगितलं. तिसरं म्हणजे पाण्याची बाटली हातात घेऊन चालू नका नाहीतर माकडं मागे लागतील अशी काळजीची सुचना दिली.मी अनवाणी जातोय याचा त्याला आनंद झाला असावा.त्यानी स्वतः तामीळ नमस्कार करत मला पाठींबा दिला.तिथल्या त्याच्या नेहमीच्या चहाप्रेमींना मी पुण्यातून इथे आलोय आणि माझ्याकडे चहा प्यायला येतो असं सांगितलं असावं मला पुणे आणि टी हे शब्द समजले त्यामूळे मी अंदाज बांधला.त्यानंतर तिथल्या एक दोघांनी माझ्याकडे पाहीलं आणि एकमेकांत गप्पा सुरू केल्या.ते काय बोलतात हे मला समजावं अशी इच्छा आहे हे त्या मित्राला समजलं आणि तो म्हणाला हो तुमचचं सांगतोय. तेव्हढ्यात तिथे एक परदेशी तरूणी आली आणि चहा प्यायला थांबली. ती तरूणीही गिरीवलमला निघाली असावी असा मी अंदाज बांधला कारण ती पण अनवाणी होती आणि तिच्या हातात एक बाटली आणि एक छोटी पर्स होती. माझ्या मित्रानी तिलाही बाटली आत ठेवायला सांगितली.
त्याला पैसे देऊन धन्यवाद देत मी गिरीवलमला जायला निघालो.पहिल्यांदा मुख्य आश्रमाचं दार दिसलं तिथे थोडं थांबलो पण दार बंद असल्यामूळे आत जाऊन दर्शन घेऊन मग गिरीवलम सुरू करता आलं नाही.बाहेरूनच नमस्कार केला आणि तसाच पुढे जायला लागलो. आश्रमाच्या उजवीकडून साधारण किलोमीटर भर चाललं की गिरीवलमचा फ़ाटा दिसतो आणि तोच फाटा चेंगम रस्ता म्हणून ओळखला जातो.डाव्या बाजुनी गेलं की चेंगम आणि उजव्या बाजूला गिरीवलम.
आश्रमाच्या पुढे तसं जाणं झालंच नसल्यामूळे तो भाग अगदीच अनोळखी होता.जरी मला गिरीवलमनी साध्य काय होणारे हे अजिबात समजलं नव्हतं तरी मी अगदी उत्साहात चालत होतो.चेंगम फाटा सोडतानाच उजवीकडे एक भलामोठा सिंह दगडात कोरलेला दिसला.तो तामीळ सिंह मागे पडल्यावर खऱ्या गिरीवलमला सुरवात झाली आणि बाकी सगळे विचार बाजूला करून फक्त गिरीवलम या अनुभवाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. गिरीवलम म्हणजे प्रदक्षिणा.एका डोंगराभोवती ज्याला शंकराचं स्थान दिलं गेलं आहे.त्या पर्वताभोवती एक प्रदक्षिणा घालून परत आपल्या स्थानी परतणं इतकं का महत्वाचं आहे हे महर्षींनी गिरीवलम करायला सांगीतल्यामूळे बघायचं होतं. महर्षी अगदी आग्रहानी गिरीवलमला जायला सांगायचे. स्वतः अनेक वेळा प्रदक्षिणा घालायचे.फक्त याच एका कारणासाठी मला जायचं होतं.साधारणपणे तीन मार्गांनी गिरीवलम पुर्ण करता येते त्यापैकी दोन मार्ग हे त्या डोंगरातूनच आहेत तर एक मार्ग मी जिथून चालत होतो तो बाहेरचा रस्त्याचा मार्ग आहे.डोंगरातले दोन्ही मार्ग आता बंद झाले आहेत आणि फक्त एकाच रस्त्याच्या मार्गानी गिरीवलमला जाता येतं.थोडं पुढे चालत गेल्यावर माझ्या लक्षात आलं मी उजवीकडूनच चाललोय आणि लोकं माझ्याकडे बघत आहेत. मी अगदी क्षणात रस्त्या ओलांडून डाव्या बाजूला गेलो आणि चालायला लागलो.वाटेत उजवीकडे गणपतीचं मंदीर समोर आलं. तामीळमध्ये लिहील्यामूळे ते गणपतीचं आहे हे थेट मुर्तीकडे पाहील्यावर समजलं.तामीळ गणपती अगदीच सुंदर दिसत होता कारण धोती धारण केलेला गणपती मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.मला ते गणपतीचं रूप पाहून आनंदही झाला आणि थोडं हसूही आलं कारण धोतीमधल्या बाप्पांना कधीच पाहिलं नव्हतं.दर्शन घेऊन परत रस्ता ओलांडून डाव्या बाजूनी चालायला सुरवात केली.डावीकडे एक एक मंदीर यायला सुरवात झाली.पहिल्यांदा यम लिंगम मंदीर आलं तिथे आत जाऊन दर्शन घेऊन अंगारा घेऊन बाहेर आलो.गिरीवलम ला अशी निरनिराळी लिंगं स्थापन करण्यात आली जी पुर्ण गिरीवलम रस्त्यावर आहेत. अगदी शेवटी अग्नीलिंगम आहे जिथे जाऊन आल्यावर गिरीवलम पुर्णं होतं.माझ्यासाठी यम हे फक्त नाव होतं कारण मला ती देवता खरं समजलीच नाही. त्या देवतेलाही साग्रसंगीत धोती गुंडाळली होती. माझ्याशिवाय तिथे फक्त पुजारी होता त्यानी मला एक फूल दिलं आणि अंगारा दिला. तिथे दहाची नोट दानपेटीत टाकून मी पुढे जायला निघालो.त्याच्या पुढे एक दोन तीन किलोमीटर गेल्यावर निरुधीलिंगम मंदीर आलं. नैऋत्य दिशेची ही देवता काळ्या जादू कर्णी इ. प्रकारांपासून रक्षण करते अशी धारणा आहे.तिथून पुढे गेल्यावर चहा प्यायला परत एकदा थांबलो.एक काकू सगळी तयारी करून नुकत्याच चहा करून स्वतः पित बसलेल्या.तो चहा काही वेगळा नसला तरी कामचलाऊ म्हणून खपून जाणारा होता.चहा आणि चालणं याशिवाय बाकी काही खास असं घडेल असं मला वाटत नव्हतं.एव्हाना इतर काही तुरळक माणसं गिरीवलम करताना दिसायला लागली.काही परदेशी माणसंही दिसली.गिरीवलम रस्ता वर्षातून दोन वेळा महाप्रचंड गर्दीनी झाकला जातो त्यामूळे तिथे व्यवस्था त्या मोठ्या प्रमाणाचा विचार करून करण्यात आल्याचं जागोजागी बघायला मिळत होतं.सार्वजनिक शौचालयं,फिरते दवाखाने असलेल्या गाड्या,बॅरिकेट्स अशी सरकारी यंत्रणा दिसायला लागली.अजून सुर्योदय झाला नव्हता.रस्त्यावर जे दिवे होते त्या प्रकाशातच साधारण ३,४ किमी चा टप्पा पार पडला होता.चहा पिऊन झाल्यावर लगेचच निघालो.डावीकडून चालताना पदपथावर काही साधू काही साधूच्या वेशातली मंडळी आपापली पथारी सावरताना दिसली काही जणं पैसे मागत होते काही साधू जप करत होते तर बरेचसे बऱ्यापैकी भुकेले वाटले.काही गांजाडी होते तर काही भामटे फक्त पैसे मागून परत गावात परतणारे वाटले.त्यांच्याबरोबरीनी माकडं तिथे दिसली.माकडं अगदीच अनप्रेडिक्टेबल असतात ती काहीही करू शकतात असं एकंदरीत त्यांच्याकडे बघून वाटलं.पण थोड्या वेळानी कळलं त्यांचाही एकच प्रश्न आहे. भूक.भुकेसाठी ती रस्त्यावर येतात तहानेसाठी बाटल्यांवर झडप घालतात.माकडिणींची एक विशेष गोष्ट तेंव्हा दिसली एखादी बाटली मिळाली किंवा खाण्याचं काही मिळालं की ती पिलांना पहिल्यांदा ते देतेच.त्याशिवाय तिला जणू घास जाणार नाही घशाखाली.भावना सार्वत्रीक असतात.त्याचं स्वरूप कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळतं इतकंच. माझ्या मित्रानी मला सांगितलेलं पाण्याची बाटली काढू नकोस पण मला राहावलं नाही आणि मी पाण्याची बाटली रस्त्यावर ठेवली तशी तिथे माकडं जमा झाली.त्यांच्यात बाटलीवरून भांडणं सुरू झाली आणि त्याला जवाबदार मी होतो हे माझ्या लक्षात आलं मग मी एक १० बाटल्यांचा बॉक्स घेऊन त्यांच्या समोर ठेवला आणि मग त्यांची भांडणं झाली नाहीत उलट अतिशय शिस्तीत त्यांनी पाणी प्यायलं.माकडं बाटलीचं झाकण उघडून पाणी पिऊन परत झाकण लावून बाटली टाकतात हे मी पहिल्यांदाच पाहीलं.त्यांना जतन करायला शिकवलं तर ते बाटली कॅरी करू शकतील हा विचार आला.पण गरज भागली की ते बाटलीला हातही लावत नाहीत.हव्यास हा प्रकार त्यांच्यात नसतोच पण गरजेपेक्षा जास्त उपभोगही त्यांना जमतच नाही.तशी सोयच नाहीये त्यांच्या मेंदूत.त्यांचा निरोप घेऊन मी पुढे जात राहीलो.पुढे गेल्यावर सुर्योदयाची लक्षणं दिसायला लागली आणि मला आनंद झाला.अचानक मला एका दुकानदारानी बोलावलं आणि इथून पुढे एक किमी वर एक मंदीर आहे ते बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका अशा आशयाचा तामिळ मध्ये संदेश दिला असावा. मला काही कि-वर्ड्स कळले आणि मी होकार देऊन पुढे निघालो. साधारण दहा मिनीटं चालल्यावर थोडी दुकानं दिसली आणि एक गाव आल्यासारखं वाटलं म्हणून जरा एकडे तिकडे नजर फिरवल्यावर मला तामीळमध्ये एक पाटी दिसली ज्यावर मंदीराचं चित्र होतं आणि एक बाण काढलेला. मी रस्ता ओलांडुन पलीकडे त्या गावात जायला निघालो. माझा तो गिरीवलम चा रस्ता सोडून जरा आडवाटेला जायचा निर्णय अतिशय योग्य होता हे थोड्याच वेळात जाणवलं.सुर्योदय अगदी नुकताच झालेला त्यामूळे त्या छोट्याशा गावावरच उत्साह पसरलेला स्पष्ट दिसत होता.हिरव्या निळ्या रंगानी रंगवलेली ती छोटी छोटी घरं मला खरोखरच पत्याच्या घरासारखी वाटली.साधारण २००० वस्ती असलेलं ते गाव मला बघता क्षणीच आवडलं.त्या गावाचा शेवट म्हणजे एक अतिशय सुंदर मंदीर.काल जे मंदीर पाहीलं त्या मंदीराच्याही सुमारे हजार वर्षांपुर्वी हे मंदीर उभारलं गेलं आहे अशी आख्यायिका आहे आणि मंदीरात गेल्यावरच ते खरंही वाटतं.ब्रह्मदेव आणि विष्णू मध्ये कोण भारी यावरून रस्सीखेच सुरू होती तेंव्हा परमेश्वरानी त्यांना एक आव्हान दिलं आणि एक आगीच्या खांबाचं रूप धारण करून त्यांना त्याच्या दोन्ही बाजू कुठे आहेत हे शोधायला सांगितलं. जो त्या शोधेल तो श्रेष्ठ असं ठरलं.त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी हंसाचं रूप धारण केलं आणि उडायला सुरवात केली पण तो कितीही उंच उडाला तरी त्याला त्या खांबाचं टोक काही दिसत नव्हतं.इकडे विष्णूनी वराहाचं रूप धारण करून जमीन उकरायला सुरवात केली आणि काही हजार वर्षांनी त्याला समाधी अवस्था प्राप्त होऊन तो खांब प्रत्येक हृदयात नित्य विराजमान असल्याचा साक्षात्कार झाला आणि तो शांत झाला. इकडे हंसाच्या रुपातला ब्रह्मदेव मात्र उंच उंच उडत राहीला तरी त्याला खांबाचं टोक दिसलं नाही पण त्याला आकाशातून सतत खाली पडणारं केतकीचं अतिशय सुंदर फुल दिसलं.त्यानी फुलाला विचारलं तू कुठून पडत्येस त्यावर फुलानी सांगितलं की खांबाच्या टोकावरून मी खाली पडते अशी कित्येक युगं मी पृथ्वीवर येत्ये. मग हंसानी त्या फुलाला शपथ घालून सांगितलं की खाली गेल्यावर विष्णूला आपण दोघेही खांबाच्या टोकावरून खाली आलोय असं सांगायचं.ठरल्याप्रमाणे केतकीनी विष्णूला तसं सांगितलं आणि विष्णूनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला.तेंव्हा इश्वरानी ब्रह्मदेवाच्या या फसवणूकीबद्दल त्याला शाप दिला आणि त्याची कधीही पूजा केली जाणार नाही असं सांगितलं तेंव्हा ब्रह्मदेवाला अतिशय वाईट वाटलं आणि तो इश्वराला शरण गेला. त्यावेळी या मंदीराची स्थापना झाली.इश्वरानी तो खांब एका डोंगरावर पुरला आणि विष्णूनी जी बाजू उकरली होती तिथून त्या डोंगरावर जायला एक रस्ता तयार केला.त्या मंदीरातून एक रस्ता थेट डोंगरावर जातो असं तिथल्या गावातले गावकरी समजतात.ते मंदीर बाहेर शहरात असलेल्या मंदीरापेक्षा त्यामूळे जुनं आहे आणि तसं छोटं असलं तरीही अतिशय अप्रतीम आहे.मंदीरात गेल्या गेल्याच तिथलं काहीसं गूढ वातावरण आपल्याला शांत करतं. मुख्य मंदीरात बराच अंधार आहे ज्यामूळे ते ‘खरं खरं’ शंकराचं मंदीर शोभतं. मोनोक्रोम हाच टोन शंकराचा आवडता असावा त्यामूळे ते मंदीरही काळ्या दगडात बांधलं गेलंय. शेजारी पार्वतीची मुर्ती आहे तो भागही बऱ्यापैकी अंधारात आहे. तिथे कोणीच नसल्यामूळे मला एकंदरीतच तिथे थांबावसं वाटलं.पुजारी त्याची कामं करून मंत्र म्हणत बाहेर निघून गेला. मी तिथे आतमध्ये थोडावेळ बसून प्रदक्षिणा घालायला बाहेर पडलो आणि समोरच असलेल्या डोंगराकडे वेडा होऊनच बघायला लागलो. जणूकाही कैलासच समोर अवतरलाय असे पांढरे लेअर्स डोंगरावर जमा झालेले. दोन तीन दहा मिनीटं मी तेच दृष्य पाहात राहिलो.

आदी अण्णामलई मंदीरातून दिसणारा अरुणाचल पर्वत…………………………….

प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर त्यातल्या त्यात मोठ्या चौथऱ्यावर बसल्यावर मला विलक्षण शांततेचा अनुभव आला.काही जागा विशेष असतात हे मला नास्तीकता संपून प्रत्यक्षात फिरायला सुरवात केल्यावर पक्क समजलंय. कोणाचा विश्वास असो नसो आपला जो अनुभव आहे तो एकतर इतरांना सांगायच्या मर्यादा आहेत आणि तितक्या तीव्रतेनी तो सांगितलाही जाणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर मी जे अनुभव आले ते तसेच्या तसे सांगणं पसंत करतो.ज्याला जे त्याच्या त्याच्या लेव्हलना अर्थ काढायचे ते तो काढायला मोकळा आहेच. तर ती जागा विशेष होती हे तिथे शिरतानाच लक्षात आलं पण जेंव्हा तिथे बसलो तेंव्हा मी त्या जागेशी एकरूप झालो. क्षणात काही वेळासाठी फ्लॅशेसमध्ये विलीन होण्याचे मला या आधीही अनुभव आलेले आहेत हा तसाच कोणताच प्रयत्न न करता आलेला अनुभव होता. मी तू पणाची झाली बोळवण. संपुर्ण विश्व नष्ट झालं आणि एकच हुंकार अस्तित्वात आहे अशी स्पष्ट जाणीव उरली.अर्धा पाऊण तास एक तास झाला असेल तेंव्हा विचार आला आणि ते जादूचे क्षण विरले.तिथून उठलो. म्हणजे मला तसं वाटलं मी उठलोय.पण ते फक्त मनाला मिळालेले संकेत होते. शरीराला समजलं नाही की त्याच्यात प्राण शिल्लक आहे.तो प्राण गोळा व्हायला काही वेळ जावा लागला आणि मन शरीर दोघे एका लयीत येऊन हालचाली शक्य झाल्या. घडलेल्या प्रसंगाचं शास्त्रीय विश्लेषण करायचं तर असं म्हणता येईल की तेंव्हा मला, ‘आपलं शरीर हा एक इतर विचारांसारखा विचार आहे’ हे अनुभवानी समजलं. इतर विचार जसे मनात जन्माला येतात आणि त्याचं एकतर एखाद्या जड पदार्थात रुपांतर होतं किंवा ते मनातच विरतात तसं आपलं शरीर हा मनाचा जडात रुपांतर झालेला विचार आहे त्यापेक्षा त्याचं अस्तित्व वेगळं नाही हे प्रत्यक्ष समजलं. आपल मन जगातल्या प्रत्येक जड कणात भरलंय प्रत्येक विचार हा त्या मनाचा आविष्कार आहे हे लक्षात आलं. मी जिथे बसलेलो तो दगडी चौथरा माझे कपडे मी (फक्त एक संबोधन या अर्थी) यांत तत्त्वतः अजिबात फरक नाही. नाम रूप वेगळं असणं हा वेगळ्या विचाराचा एक प्रकार आहे पण तो मनाचाच भाग आहे.मन पुर्ण नष्ट होतं तेंव्हा त्याच्या सत्तेतले विचारही पुर्ण नाहीसे होतात ज्यांत शरीराचाही समावेश आहे. त्यानंतर जे शिल्लक राहतं तो हुंकार मी ऐकला का पाहिला का अनुभवला हे नाही सांगता येणार नक्की.हुंकार म्हणजे श्वास होता का हेही नाही सांगता येणार.पण तेंव्हा मला(हे तरी कसं म्हणू) वेळ स्थळ(आपण ‘शरीर’ या विचारामूळे एक जागा व्यापतो त्याचाही एक वेगळा विचार आपल्या मनात असतो ज्याचं भान फक्त झोपेतच बहुदा नष्ट होतं एरवी आपण पडत नाही,कुठेही फिरतो हालचाली करतो तेंव्हा ते व्यापलेल्या जागेचं अगदी प्रिसाईज भान आपल्या मनात रजिस्टर झालेलं असतं.ज्याला आपण ‘मी’ या संज्ञेत स्थान देतो.) आणि घडणाऱ्या घटना(कार्यकारणभाव) मला सोडून गेलें असं वाटलं(हे घडलं असेल अशी शक्यता आहे खात्री नाही).त्यानंतर मी काही फोटो काढले(वर दिसतोय तोही). हे मंदीर परत एकदा नव्यानी बांधलं गेलं असेल किंवा पडझड होऊन परत काही डागडुजी करण्यात आली असेल अशा काही खुणा मंदीराच्या संरक्षक भिंतीवर बघायला मिळतात.त्या भिंतींवर जे कोरीव काम केलंय तिथे पक्षांसाठी खाचा बनवल्या आहेत जिथे एका खाचेत एक पक्षी बसू शकतो.पक्षांसाठी हा विचार केलेला बघून मला खरंच आनंद झाला. आपण प्रत्येक कणाला आपलं मानणारी लोकं आहोत या विचाराचा नुकताच घेतलेला अनुभव या पक्षांच्या जागा करण्याच्या उदात्त भावनेनी अजून सुखकारक वाटला.

मंदीराबाहेर आलो तसं बऱ्यापैकी गाव जागं झालेलं काही घरांपुढे रांगोळ्याही काढून झालेल्या.एक दोन हार विकणारे त्यांच्या छोटेखानी दुकानाची तयारी करत होते.परत एकदा मुख्य गिरीवलम रस्त्यावर येऊन चालायला सुरवात केली. आधीचं चालणं आणि आता चालणं यात बराच फरक जाणवला.आता प्रत्येक छोट्या मंदीराजवळही अनेक भिकारी,माकडं,साधू जमले होते. वाटेत गौतम ऋषींचं मंदीर पाहिलं. सप्तर्षीं मधले एक गौतम ऋषीं अरुणाचल पर्वतावर येऊन गेलेत अशी एक आख्यायिका आहे. थोडा वेळ तिथे बसून पुढची वाट धरली.एव्हाना महर्षी इतक्या आग्रहानी गिरीवलम करायला का सांगत असावेत हे लक्षात यायला लागलं. मगाशी ज्या मंदीरात गेलो ते एकूण गिरीवलमच्या अर्ध्या वाटेवर आहे हे लक्षात आलं आणि आता अजून अर्धा रस्ता बाकी होता हे समजलं. पुढच्या रस्त्यावर इतरही काही ठिकाणं आहेत,जसं एक जागा आहे तिथून तो पर्वत झोपलेल्या शंकराच्या मुर्तीसारखा दिसतो, अजून एक जागा आहे जिथून आपल्याला नंदीसारख्या एका मोठाल्या दगडाचं दर्शन होतं.तो नंदीसारखा दगड आपल्या देवाकडे बघतोय असा भास होतो.पुढे ‘इक्कडू’ नावाचं एक ठिकाण आहे जिथे बरीच लोकं आपल्या शरीराचे उपचार करायला येतात. चहा,कॉफी ची बरीच केंद्र एव्हाना सुरू झालेली दिसली पण मी आता चालतच होतो.शेवटचा ४ किमी रस्ता हा मुख्य शहरातूनच आहे रेल्वे स्टेशन पासून शहरात जे भव्य मंदीर आहे तिथेही एक लिंग स्थापन करण्यात आलंय तिथून शेवटचं शेषाद्री आश्रमाच्या अलीकडे असलेलं अग्नी लिंग शेवटचं आहे. तिथे दर्शन घेऊन मी सरळ आश्रमात गेलो आणि आवेगात साष्टांग नमस्कार त्या पर्वताला घातला.गिरीवलमनी मला योग्य ते सगळं शिकवलं,दाखवलं होतं.गिरीवलम म्हणजे प्रदक्षिणा. आपल्याभोवती. एक प्रकारचं ‘spiritual analysis’. आपण जसे आहोत तसं आपल्याला सगळं अगदी सहज दाखवण्याची सोय. अंतर्बाह्य दर्शन फक्त काही वेळ चालून. कठीण वाटतं विश्वास ठेवायला पण एक एक पाऊल आपल्याला काहीतरी शिकवतं. खरं खरं ज्ञान देतं. माहिती गोळा करण्याची सवय लागलेल्या मनाला आवरता येणं खरंच कठीण असताना चौथऱ्यावर बसून मिळालेले फिजिक्सच्या नियमांच्या बाहेरचं विश्व दाखवणारे ते भेसळ नसलेले क्षण आठवून मी अक्षरशः थरथरायला लागलो. गिरीवलम हा अनुभव काही चुनिंदा अनुभवांपैकी एक आहे जो माझ्याबरोबर तेंव्हापासून रोज आहेच.

त्यानंतर मी जवळपास पुर्ण दिवस आश्रमात घालवला.
आश्रम,तिथला परिसर,तिथे मी राहिल्यावर मला आलेले अनुभव याबद्दल सविस्तर लिहीनच.
रात्री कॉफी घेऊन गिरीवलम परत एकदा आठवलं आणि सरळ झोपायला गेलो.
आश्रमासमोरूनच बस मिळाल्यामूळे धावपळ वाचली. बसमध्ये बसल्यावर घरातूनच बाहेरगावी जायला निघत आहोत असा फील आला ज्यामूळे अर्थातच वाईट वाटलं.फक्त दोनच दिवसात मला जुनी ओळख असल्यासारखं ते शहर आपलंसं वाटलं.परत एकदा तो गिरीवलमचा फाटा दिसला. यावेळी मात्र मी डावीकडे वळालो.तरी नजर त्याच उजवीकडच्या रस्त्यावर होती. पदपथावर एक माकड दिसलं. आपल्याच तंद्रीत बाटली हातात घेऊन गोल गोल घिरट्या घालत होतं. आपण कोण आहोत याचं अजिबात भान नाही. अगदी अनभिज्ञ. तरी पण तो जीव जगतोय.तरीपण तो चालतोय.कधीतरी गिरीवलम त्याचंही पुरं होणारच आहे. प्रत्येक जीवाचंच होणारे.तसा नियमच आहे.पण त्याच्या नशीबात सध्या तरी माकडचेष्टाच आहे.माझ्या हातातली बाटली पडली.ती उचलली.सगळं सामान घेतलं आहे ना याची खात्री केली. एव्हाना तिरुवन्नमलै मागे पडलं होतं.
माकडाच्या गोल गोल गिरक्या आठवत होत्या. तसा विशेष फरक नव्हता. नामारूपाचा.
गिरक्या वेगळ्या. नाहीतर माकडचेष्टाच………………

गिरीवलम रस्ता………….उजवीकडे गणपती मंदीर………….
सुर्योदयानंतरचे काही क्षण.