कांतारा..मन

जगण्याचा अनुभव थोडाफार गाठीशी आला की लक्षात येतं की हे जगणं किंवा या जगाचा अनुभव ट्विस्टेड आहे,तो सरळ नाही.
जगण्याचा अनुभव वगैरे जड जड काही लिहित नाहीये.उलट काही गोष्टी सोप्याच करून जशा आहेत तशा सांगायचा भाबडा प्रयत्न करतोय.
कांतारा चित्रपट पाहून खरंतर खूप दिवस झालेत पण हे लिहायला जरा उशीरंच झाला.चित्रपट पाहणं आणि त्यातून काही लिखाण करायची इच्छा होणं आता फारसं घडत नाही.एकतर तसे सिनेमे नसतात आणि असले तर त्याची कथा काय होती हे सांगायला लिहित बसावं इतका उत्साह नसतो.
७७७ चार्ली सिनेमा पाहिला आणि लिहायचं आहेच त्याबद्दल.तो सिनेमा अनेक दिवस डोक्यात राहील. असो. 
गेली १२ १३ वर्षं डोक्यातले विचार एका सरळ रेषेत मांडले तर ते लिनिअर नसतील तर अतिशय विस्कळीत आणि तुटलेले धागे असतात तसे असतील असं कायम वाटतं.एक प्रोसेस असते विचारांची आणि त्या प्रमाणात त्या तीव्रतेनं ते विचार रचले जातात डोक्यात.जर विचार खूप जास्त असतील तर त्यांचा संच बनतो.एकाच विषयाचे विचार ड्राईव्ह वर जसा फोल्डर करतो तसे रचत गेलं तर एक साचेबद्ध मांडणी तयार होईल.पण माझी ही ड्राईव्ह ची साचेबद्ध रचना विस्कळीत झाली आणि त्यातले बरेचसे फोल्डर डिलीट झालेच पण आता नवीन फोल्डर तयार होत नाहीतच असं वाटतं.एखादी एखादी फाईल येऊन आपोआप ट्रॅश मध्ये जाऊन बसते.
कांतारा चित्रपट ट्रॅशमध्ये नं गेलेली फाईल आहे.
एका राजाला मनःशांती मिळावी याची इच्छा आहे.त्यासाठी तो सर्वस्व पणाला लावतो.एका जंगलात त्याला ती शांती मिळते आणि त्या जंगलातल्या एका दैवताला तो शरण जातो.त्या बदल्यात त्या जंगलातल्या वसाहतीला जमीन देतो. त्या दैवताच्या रूपात असलेल्या मनुष्याचा आवाज जिथे जाईल तितकी जमीन तो राजा सहजी देऊन बदल्यात जी शांती मिळाली ती हसत हसत घेऊन घरी जातो आणि त्यानंतर आयुष्यभर सुखात समाधानात जगतो.तीन काळांमध्ये विभागलेला हा सिनेमाचा पहिला भाग बहुतेक १८ व्या शतकातला आहे.त्यानंतर एकोणीसाव्या शतकातला प्रसंग आहे ज्यात त्या राजाचा एक वंशज त्या जमीनीचा हक्क मागायला येतो आणि त्या दैवताच्या दैवत असण्याबद्दल शंका घेऊन त्याला जमीनीचा हक्क मागतो.नाही मिळाला तर कोर्टात जायला तयार झालेला तो उर्मट वंशज त्याच कोर्टाच्या पायऱ्यांवर मरतो.
तिसऱ्या भागात एक उनाड तरूण गावात उनाडक्या करत फिरत असतो.त्याची आई त्याच्या नावानी रोज शिमगा करत असते तरीही तो आणि त्याचे काही संदीप मित्रं त्याच्याबरोबर चकाट्या पिटण्यात धन्यता मानत असतात.एकंदरीत आयुष्य मजेत घालवत असलेल्या त्या तरूणाला झोपेत काही अनाकलनीय गोष्टी दिसत असतात ज्यानी तो जागा होत असतो.गावात अर्थातच एक जमीनदार आहे जो त्या उर्मट वंशजाचा मुलगा आहे.गावात बर्यापैकी वजन असलेला तो जमीनदार पैशाच्या बदल्यात या तरूणाकडून कामं करून घेत असतो.
मग त्या तरूणाच्या आयुष्यात एक मुलगी येणं,गावावर संकट येणं आणि त्यात हा तरूण आणि त्याचे मित्र ते सोडवायला पुढाकार घेणं हेही ओघानी आलंच.यात एक गोष्ट सांगायची राहिली की उर्मट तरूणानी ज्या दैवतातल्या माणसामध्ये दैवताचा प्रवेश आहे का नाटक आहे अशी शंका घेतलेली असते तो या रिकाम्या तरूणाचा बाप असतो.(ऑब्वियस!).झोपेत दिसणाऱ्या घटना कदाचीत याच्याशीच संबंधीत असाव्यात असं वाटतं.(!!) 
या तरूणाला त्याच्या वडिलांप्रमाणे गावातल्या उत्सवात ‘कोला’ नावाची एक प्रथा करायची जबाबदारी असते पण तो वाया गेलेला तरूण हे सगळं अजिबात न करता जमेल तसं आपल्या आईच्या मनाविरूद्ध वागून आणि परंपरांना धुडकावत तिला छळत असतो.त्या गावातली कोला ही प्रथा त्यामूळे गुरव नावाच्या तरुणावर असते.हा धार्मिक आणि अत्यंत साधा गुरव आपल्या गल्लीतला भाई असलेल्या तरूणाचा म्हणजेच शिवाचा चुलत भाऊ.
मग पुढे काही अनपेक्षित असलेले अपेक्षित प्रसंग घडतात आणि चित्रपट एका अत्यंत साध्या विषयाला फोडणी देत देत पुढे सरकतो. आणि हो,त्या जंगलात एक फॉरेस्टचा अधिकारी असतो जो आपल्या शिवाचा अगदी दुष्मन असतो.
त्यानंतर काही काही मगाशी म्हणलं ते अनपेक्षित प्रसंग अपेक्षित वेळांना घडतात,शिवा आणि ऑफिसर पालटतात. कथा संपायच्या टप्प्यात येते.
तर असा हा साधा सरळ आणि अतिशय नाईव्ह कथा असलेला सिनेमा बघून मला काय अशी इच्छा झाली लिहायची असा प्रश्न पडू शकतो.
तो भाग यापुढे आहे.
तर,जगण्याचा अनुभव ट्विस्टेड असतो.जग,माणूस,अनुभव,विचार,मन हे सगळे अतिशय सोपे आणि अतिशय गुंतागुंतीचे विषय आहेत.
अगदी भल्याभल्या पंडीतांनाही हे सापडत नाही की या सगळ्याची लॉजिकल संगती कशी लावायची.एखादं उत्तर मिळावं आणि अजून शंभर प्रश्न पडावेत असं सगळं विचित्र सुरू असलेलं हे जग नक्की काय आहे?
जगातल्या ‘घटना’ खरंच घटना आहेत का काळ,स्थान आणि कार्यकारणाची आवरणं असलेलं ते एक विचारांचं फलित आहे?का जगंच विचार आहेत?का जगंही आहे आणि विचारंही आहेत?
बरं आणि माणूस नावाच्या घटकालाच शांती हवी आहे का प्रत्येक जीव त्यासाठी झगडतोय?ही शांती काय आहे?आपलं राज्य देऊन टाकावं असं त्या राजाला वाटावं इतकं काय त्याला त्याबदल्यात मिळणार आहे?खरंच असं कोणी करेल?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि अल्पमतीला ज्या गोष्टी उलगडल्या आणि ज्यामूळे विचार लिनिअर राहिले नाहीत त्या प्रोसेसचा या सिनेमाच्या निमित्तानं परत नव्यानी विचार डोक्यात आला.
प्रत्येक सजीव हा पुढे जाण्यासाठी तळमळत आहे आणि एक एक पायरी ओलांडत ओलांडत तो शेवटी अशा जागेवर जाईल जिथून पुढे त्याची ती तळमळ थांबेल.ही तळमळ प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीत आहेच.प्रत्येक दगडांचा विकास होणार आहे.प्रत्येक सजीवाला ही शेवटची पायरी मिळणार आहे.
या सिनेमात अशा काही गोष्टी आहेत ज्याचा थेट संबंध या गोष्टींशी आहे.
हा जो पुढच्या पायरीवर जायचा संघर्ष आहे तो त्या दैवताच्या रूपात दाखवला आहे.तिथल्या माणसाच्या शरीरात काही वेळ एक अनाकलनीय शक्ती प्रवेश करते जीला सगळे दैव मानतात.ही जी माणसाला दैव दर्जा देण्याची कल्पना आहे ही हिंदू धर्माचा अभ्यास केलेल्याला खास आवडेल. हिंदू इतर कोणत्याही बाबतीत मागे असुदे पण प्रश्न आपल्या अस्तित्वाच्या सत्याचा शोध घेण्याचा असला की तो जी पद्धत, जो पायंडा पाडतो ते इतर कोणत्याही पंथात किंवा धर्मात अनुभवायला मिळूच शकत नाही हे दैव हे त्याचंच एक उदाहरण आहे.
इतर धर्मात प्रत्येक माणूस जास्तीत जास्त कोण होईल याचे साधारण आराखडे मांडले आहेत ज्यात तो एक उत्तम बाप,मित्र,मैत्रीण,आई,आनंदी,दुःखी इ.गोष्टींचा उल्लेख असतो. माकडाचा माणूस झाला म्हणणारे त्यांच्या दुर्दैवाने माणसाला त्याच्या पुढे कोणत्याच फॉर्ममध्ये पाहायला जात नाहीत.भूताखेतांच्या बाबतीतच फक्त त्या बापड्यांची कल्पना अगदी विस्तारते पण माणूस हा माणूसच राहतो आणि शेवटी मरतो हेच सगळे स्वीकारतात.पण हिंदू म्हणतो आमच्याकडे याहीपुढे जाऊन एक पायरी आहे. फक्त एकच कशाला यापुढेच आमच्या पायऱ्या सुरू होतात. उन्नतीचा हा ध्यास, हा संघर्ष हिंदूच्या मते सुरवात आहे एका प्रवासाची.दैव ज्या शरीरात येतं ते शरीर एका दुर्घटनेला सामोरं गेल्यावर तिथली इतर वरिष्ठ मंडळी ठरवतात की या शरीरात दैव आहे आणि ते शरीर आपण जपलं पाहिजे.दैवानी काही मिनिटं स्पर्श केलेल्या शरीराची ते पुजाच करतात एकप्रकारे.किती आदर आहे या उन्नतीचा. शरीर मुळात जाणत नाही काहीच पण दैवाचा स्पर्श झाला की ते पावन होतं.हा विचार जितक्या साध्या पद्धतीनी त्या सिनेमात दाखवलाय तिथेच तो दिग्दर्शक जिंकलाय.
ही मोठ्या उदात्त उन्नतीकडे जायची ओढ इतकी तीव्र आहे की दैवातला माणूस आयुष्याचा,घरातल्या माणसांचा त्याग करत थेट त्या उन्नत विचारात सामील होतो.हे एक अद्भुत चमत्काराचं लक्षण आहे.सोपं नाही.राजाचा त्याग आणि हा त्याग कशासाठी आहे हे ज्यांना समजलं ते या सगळ्या जगाचं मर्म जाणणारे या पसाऱ्यात अडकत नाहीत.
शिवा जवळपास नव्वद टक्के सिनेमात अतिशय चुकीचं वागलाय आणि शेवटी एका सेकंदाच्या एका घटनेमुळे त्याचं आयुष्य ३६० अंशात फिरत फिरत त्याला त्या उन्नतीचा रस्ता दाखवतं.
हे घडू शकतं.
याला साक्षात्कार म्हणुया.एक ‘दर्शन’ असा सिनेमात उल्लेख आहे.हे दर्शन ज्याला घडलं तो माणूस या शांततेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो.
वर म्हणलेली ट्वीस्टेड जगाची गोष्ट मनात सुरू होते.
कांतारा म्हणजे आपलं मनंच नाही का?
एका दर्शनाची गरज आहे,एका सेकंदभराच्या बदलाची.उन्नतीचा मार्ग आपोआप समजतो.शांतता आपोआप मिळते.
कांतारा आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे. मोडका,जीर्ण,भरकटलेला आणि शांतता(पांढरं कबूतर वाली नाही,सत्चिदानंद) सोडून कशाचीच ओढ नसलेला धर्म.यातल्या शांततेच्या ओढीपायी आपण अगदी सर्वस्वही घालवू,फिकीर नाही.कोणालाही आंदण दिल्यासारखी जमीन देऊन टाकू,फिकीर नाही.ही शांतता मिळवूच.तो मिळवायचा राजमार्ग आपल्याच धर्माला समजला आहे तो यामूळेच. बाकीचे बसले जमिनी,आकाश,दिशा यामध्ये अर्थ शोधत,आपण ते सगळं सोडून त्या पलिकडे असलेल्या जगात फक्त जाऊनच आलो नाही तर तिथे जाण्याचा मार्ग नक्की केला जो अगदी गरिबातल्या गरिब फाटक्यालाही माहीती आहे.
राजा जसा भिक मागत फिरत होता तसे मला हे प्रगत देश दिसत आहेत.भिका मागत आहेत पण शांतता मिळत नाहीये.
कशी मिळेल.गृहीतकंच चुकीचं आहे.
तर हे जग ट्विस्टेड नाहीये.
जग नाहीचे.
गृहीतकंच चुकीचं आहे.
असो.
आज इतकंच.