असंच एकदा तामीळ गाणी ऐकता ऐकता ’96 चं ‘लाईफ ऑफ राम’ गाणं पाहण्यात आलं त्यावेळी ‘मक्कळ सेल्वन'(सेतुपथी) अगदी वेगळ्या रूपात पाहायला मिळाला आणि लगेच ट्रेलर पाहीलं आणि ’96 आल्या आल्या पाहायचा ठरवला.
काही महिन्यांनी सन नेक्स्ट वर ’96 तामीळ मध्ये आला आणि लगेच त्याच रात्री अधाशासारखा पाहून काढला.
चित्रपटाची सुरवात एका वायोलीनच्या अतिशय हळूवार धुननी होते आणि ’96 असं लिहिलेलं पोस्टर स्क्रीनवर दिसतं. इतकं खोलात जाऊन सांगतोय कारण हे पोस्टर झूम करून पाहिलं तरी मन मागे ९० च्या दशकात जाऊन पोहोचतं. या पोस्टरवरच मी फिदा झालो.त्यात लहान असताना ज्या गोष्टींचं आपल्याला अप्रुप होतं अशा सगळ्या गोष्टी अतिशय कलात्मक पद्धतीनं त्यावर आहेत.
त्यानंतर अर्थातच लाईफ ऑफ राम गाणं सुरू होतं आणि त्यानी मारलेल्या पहिल्या डुबकी बरोबरच आपणही या चित्रपटात बुडून जातो.
चित्रपटाची कथा तशी साधी सरळ आहे.शाळेत असतानाचं प्रेम नंतरच्या आयुष्यात कसं बदलतं आणि परत एक दिवस तेच प्रेम त्या आठवणी कशा अनुभवल्या जातात अशी साधी कथा आहे.या चित्रपटाचं सादरीकरण इतकं सुंदर आहे की हीच साधी कथा प्रेमाचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळे स्तर सहज उलगडून सांगते. या उच्च सादरीकरणाला संगीताची साथ जी लाभली आहे त्याला खरंच तोड नाही. या चित्रपटाला जे संगीत मिळालं आहे फक्त त्यावरच एक लेख सहज लिहिला जाऊ शकतो. अगदी पहिल्या वायोलीन पासून वसंता कालंगलच्या ह्रदयाच्या अगदी तळात पोचलेल्या मनाला हळवं करणाऱ्या भावना वर आणायचं काम गोविंद वसंतनी केलंय (वायोलीन त्यानीच वाजवलं आहे.)
यातलं काधले काधले गाणं असंच विशेष आहे. त्यात या संगीतकारानी व्हेल मासा आणि एका पक्षाचे आवाज मागे वापरले आहेत जे या चित्रपटाची कथा सांगतात. व्हेल मासा आणि पक्षाची अपुर्ण प्रेमकथा प्रत्यक्ष चित्रपटातल्या राम जानकीच्या प्रेमकथेचं अतिशय हळवं प्रतिक आहे.
’96 बद्दल थोडक्यात लिहिणं जरा जड जातंय किंवा हे लिखाण जरा कृत्रीम होतंय कारण तो प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.
विजय सेतुपथी बद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना त्याची अफलातून कामं माहितंच असतील . अतिशय सहज अभिनय आणि स्क्रीनवर अगदी सामान्य माणसासारखा वावर आपल्याला याही चित्रपटात दिसतो आणि आपण त्याला अगदी पहिल्या फ्रेमपासून रामच समजायला लागतो. अजून एक अगदी जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे या चित्रपटात त्रिशाची एंट्री ५४ व्या मिनिटाला होते. त्या आधी शाळेतलीच जानकी दाखवली आहे. त्रिशा इतक्या उशीरा पडद्यावर येते तरी पण ती जानकी अगदी एका सेकंदातच बनते.म्हणजे ज्यांनी यानंतर तेलगू आणि कानडी रिमेक पाहिले असतील त्यांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येईल.
यातली प्रत्येक फ्रेम विचार करून मांडली आहे.जर अशा फ्रेम ना ऑस्कर मिळत असतं तर यातल्या बऱ्याच फ्रेम्सना मी ऑस्कर दिलं असतं
तंजावरचं वातावरण राम जेंव्हा वर्णन करून दाखवतो तो प्रसंग
रामच्या फ्लॅटमधले प्रसंग.त्रिशा रामच्या विद्यार्थीनींना आमचं प्रेम कसं झालं हे सांगतानाचा प्रसंग.
शाळेतले सगळेच प्रसंग.मेट्रोच्या धक्क्यानी सावरायला हात ठेवतानाची धावपळ.रामची बॅग,त्यातला शाई लागलेला शर्ट.
फ्लॉपीशी खेळत असलेली जानकी.
अबोल आणि एखाद्या डोहासारखा राम अगदी शाळेत असल्यापासून मोठा झाल्यावरही तसाच दाखवणं कमाल आहे.
विमानतळावर दोघं पाठमोरे उभे असतात तो प्रसंग
येताना रामच्या कारमध्ये अर्धी सावली पडलेली दाखवली आहे. इतकी सुंदर फ्रेम सुचू कशी शकते.केवळ अप्रतिम.
त्रिशा आणि सेतुपथी किंवा जानकी राम आपण विसरूच शकणार नाही.
असे चित्रपट खुपच कमी असतात जे इतका प्रभाव पाडतात. हा मला तसाच भिडलाय.
हे लिहून माझंच समाधान झालं नाहीये. बघू परत कधीतरी बाकीचं लिहिलं जाईल.
असो,
प्रेमाला शोधायला जाऊ नका, एक दिवस तेच तुमच्या जवळ येऊन पोहोचेल आपोआप.तुमच्या नकळत.आणि एकदा ते तुमच्या जवळ आलं की परिस्थिती बदलली,काळानी आपली पावलं टाकली तरीही ते अगदी तसच्या तसं असेलच कुठेतरी आत. त्याला तसंच जपा.
जगण्याच्या प्रत्येक श्वासात…..