गणपती..

एकदा वस्तुस्थिती काय आहे दिसली की मग ठरवूनही त्यात बदल करता येत नाही. एकदा लहान असताना निळा रंग आकाशाचा, असं दाखवलं गेलं की मग तो कायमचा मनात राहतो. परत संदिग्ध विचार निळ्या रंगाबद्दल कधीच येत नाहीत. लाल रंग त्यानंतर कोणी निळा आहे असं म्हणणारंच नाही. तसंच काही काही वेळा लेव्हल्स मध्ये काही गोष्टी समजत जातात आणि प्रत्येक वेळी या आधी जी अवस्था होती ती मागे पडून पुढचं काहीतरी अजून प्रगल्भ समजत जातं. ते एकदा समजलं की मग आधीचं जे शिकलेलं असतं ते आपोआप मागे पडत जातं आणि खरं तर ते गरजेचंही उरत नाही.पोहायच्या पहिल्या काही दिवसांमध्ये आपण पाण्याशी झगडत असतो पण एकदा खोल पाण्यात उडी मारून परत वर येऊन नीट पोहता यायला लागलं की तो त्या आधीचा झगडा परत कधीच करावा लागत नाही. दर वेळी पोहायला गेल्यावर पहिले काही वेळ झगडायचं आणि मग नीट पोहायचं असं नसतं आपण पाण्यात उतरल्या उतरल्या पोहायलाच लागतो त्यासाठी वेगळा आटापिटा करावा लागतंच नाही, ते आपोआप घडतं. गाडी शिकताना होणार तारांबळ एकदा गाडी आल्यावर नष्ट होते परत ती कधीच करावी लागत नाही.
तशीच आपल्या मनाची रचना आहे. सत्य समजायच्या पायऱ्या आहेत त्यातली जशी जशी सत्य समजत जातात तशी आधीची सत्यं बिनकामी ठरतात. कोकणात एखाद्या गावाला जायचं असेल पत्ता शोधत तर पहिल्यांदा दमछाक होऊ शकेल.एखादा लवकर शोधेल एखाद्याला वेळ लागेल, विचारवं लागेल. पण एकदा ते गाव सापडलं की पुढच्या वेळी ते पहिल्यांदा जितक्या कष्टानी शोधलं तितकं शोधावं लागणार नाही.काहींना तर ते अगदी झटक्यात मिळून जाईल.
अध्यात्मामध्ये अगदी असंच आहे. आधीची गोष्ट मनात असताना एकदा पुढची अजून चांगली गोष्ट समजली तर आधीची गोष्ट आपोआप मागे पडते नव्हे ती डोक्यातही येत नाही.
लहान असताना गणपती या देवाविषयी प्रचंड आकर्षण होतं. सार्वजनिक उत्सव फार असा आवडला नसला तरी ती देवता जवळची वाटायची. पुढे अजून बऱ्याच गोष्टी जशा जशा समजत गेल्या तसं त्यातलं ममत्व कमी व्हायला लागलं आणि इतपत गोष्टी पुढे गेल्या की आता तो एक मातीचा आकार म्हणूनच पाहिला जातो.  ‘मुर्ती’ सारखं त्याकडे पाहिलंच जात नाही. जसं इतर आकार तसा तो एक आकार इतकंच त्याचं अस्तित्व शिल्लक राहीलं आहे. मी नास्तिक आहे किंवा पुरोगामी माणूस आहे असा समज होणं साहजिक आहे पण मी अतिशय आस्तिक आणि धार्मिक विचारांचा माणूस आहे पण मगाशी जी उदाहारणं दिली तशीच हे बदल ठरवून झालेले नाहीत आपोआप जे मिळत गेलं ते वेचत गेलो आणि ही एक अवस्था सुरू आहे. कदाचीत यापुढे अजून काही वेगळं यापुढचं सत्य मिळालं तर हे विचार बदलतीलही (मूळ गाभा तसाच राहील तो बदलणं शक्य नाही कारण तो बदल हा तीव्रतेचा बदल नव्हता तर प्रकाराचा बदल होता(म्हणजे निळा रंग आकाशाचा निळा का शाईचा निळा असा बदल नसून तो ‘निळा’ रंग आहे हे पहिल्यांदा समजणं हा तो बदल होता.))
तर मला आता गणपतीला दुर्वा मोदक लाल फूल वगैरे दिले नाही दिले काहीच वाटत नाही मुळात आतून त्याला काही द्यावं अशी इच्छाच होत नाही. ‘भव भ्रमाचा आकार’ हे सत्य जेंव्हा याची देही अनुभवायचा योग आला तेंव्हापासून हे आकार, संज्ञा, चेहरे या गोष्टी अगदीच दुर्लक्षिल्या जातात तसंच काहीसं या गणपती बाप्पाच्या बाबतीत घडलं असेल असं वाटतं.
तर त्या मातीमध्ये गणपतीचा आकार आहे त्याचा मी अपमान करतो का? तर तसं अजिबात नाहीये. मला तो आकार आवडतो. गणपतीचा एक आकार ठरवला गेला तो आकार मातीपासून बनवला गेलाय यामागे लोकांच्या भावना आहेत आणि ज्या अगदी शुद्ध सात्विक आहेत याचंही भान आहेच पण परत मागची उदाहरणं पाहिली तर लक्षात येतं की आता हे उपचार नको वाटतात.  हे अध्यात्माचं ज्ञान आपल्याला जगातल्या प्रत्येक वस्तुचा ‘गाभा’ ओळखायची एक नवी दृष्टी देतं आणि मग प्रत्येक पदार्थाचं यथार्थ ज्ञान आपल्याला होतं, तसंच या मातीच्या आकाराला भले गणपती म्हणलं तरी त्यात असलेली गणपतीची मुर्ती घडवायची प्रेरणा ही आणि ती मुर्ती यांतलं नातं समजतं. एक कल्पना आणि एक आकाराला आलेली कल्पना. दोन्ही एकच. एक दिसत नाही एक प्रत्यक्ष दिसते.काय खरं?
दोन्ही खरं का दोन्ही खोटं?
दोन्ही खोटं…….
या सगळ्या गोष्टी मनाच्या पसाऱ्यातच सामील होतात आणि यामुळे या सगळ्यामागे प्रेरणा आहे ती शक्ती आपोआप झाकली जाऊन जे आपण बघतोय जे विचार करतोय तेच खरे वाटायला लागतात आणि आपोआप आपण ‘कर्ता’ असल्याचा भास आपल्याला होतो.
या गोष्टी फसव्या आहेत हे अनुभवानी समजलं की मग हे आकार रूपं यांत सत्य शोधायचा प्रयत्नच केला जात नाही आणि माणूस फक्त जे सत्य आहे ते घेऊन बाकीचं त्याआधीच्या पायऱ्यांचं सत्य टाकाऊ म्हणून त्यागतो.
ज्या मातीचा गणपती बनला ती विसर्जन झाल्यावर परत माती झाली तर त्यात त्या भावना प्रकट होतात?ते प्रेम ती आपुलकी तो आदर शिल्लक राहतो?
मग त्या भावना त्या आकारात असतात का त्या भावना जिथे तयार झाल्या त्या मनात?
तो आकार खरा आहे ? (खरा आकार असेल तर पाण्यानी कसा बदलतो?)
तो आकार आपल्या मनातच तर तयार होत नाही?
विद्युतदाहिनी मधून जळालेल्या देहाची माती झाल्यावर त्याचा गणपती बनवला तर त्या आकारात दैवत्व शोधलं जाईल?
कदाचित नाही.
आकार गणपतीचाच असेल तरीही नाही.
मातीचेच दोन प्रकार.
किती फरक.
खरंच आहे फरक?
काय आहे फरक माणसाची माती होण्या आधीचा माणूस आणि नंतर माती झाल्यावरचा माणूस.
फरक आहे का फक्त तसा आहे असं वाटतंय?
आकार तयार होतात नष्ट होतातच मग ही खटपट का सुरू आहे?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जो देऊ शकतो तो ज्ञानी

ज्ञानी होऊया.
गणपती खरा कोण आहे हे समजून घेऊया.
शुभं भवतु।