आपला आकार आपल्याला आरशात दिसतो त्यात आपण जसं दिसतो तसं एरवी कधीच पाहता येत नाही, अनुभवता येत नाही त्यामुळे आपण खरं कसं दिसतो हेच आपल्याला बऱ्याच वेळा दिसतंच नाही. बाकीचे आपल्याला सहज बघत असतात त्यामुळे कदाचित आपल्या पेक्षा त्यांनाच ही गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीनं मांडता येऊ शकेल.
आपला आकार आपल्याला दिसत नाही तरी आपण तो आकार सदैव आपल्याला चिकटल्यासारखे सगळे व्यवहार पार पाडत असतो.कधीतरी आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आपण आपला आकार दिवसातून किती वेळा अनुभवतो?
माझ्यापुरता विचार केला तर मला जाणवलं की मी माझा आकार कदाचीत एकदाही बघत नाही.
आरशात आपलं स्वरूप बघावं लागणं हे जरा विनोदी वाटत नाही का? का फक्त मलाच हा प्रकार जरा वेगळा वाटतोय? आपण कसे दिसतो हा प्रश्न पडला तर आपल्या मनातही एखादा फोटोच येतो का आपल्याला एक सेकंद काहीच सुचत नाही? कधीतरी असा प्रश्न पडल्यावर मी विचार केला तर मला एक दीर्घ पोकळ असा एक विचार सोडून काहीच मनात आलं नाही. कोणताच आकार मला जाणवला नाही. मग मला या वाटलेल्या प्रश्नात काही तथ्य असल्याचं जाणवलं. का होतय असं याचा जरा विचार करायचं ठरवलं आणि एकदा आरसा घेऊन बसलो आणि माझा चेहरा न्याहाळला.काही वेळ तो न्याहाळल्या नंतर डोळे मिटले तर मला तो चेहरा दिसायला लागला आणि असाच प्रयोग काही वेळ केल्यानंतर मला माझा चेहरा स्पष्ट दिसायला लागला. म्हणजे आरसा ठेऊन डोळे मिटून बसलं की काही सेकंदातच एक आकार मनात तयार व्हायला लागला आणि तो माझाच आहे याची खात्री पटली. मग मी अजून एक प्रयोग करून पाहिला. मी माझ्या आवडत्या त्रिशाचा फोटो पाहिला काही वेळ आणि डोळे मिटले तर तिचाही चेहरा मला अगदी माझा चेहरा जसा स्पष्ट दिसतो तसाच दिसला.
थोडक्यात आपण आपला चेहरा आरशात पाहातो तो आकारच आपल्याला डोळे मिटल्यावर दिसतो आणि त्यासाठी आपल्या चेहऱ्याचा किंवा बाह्य रूपाचा आपल्याला अनुभव यायलाच पाहिजे ही अट नसतेच. आपण आपलं रूप अनुभवून मग आपल्याला आपण दिसतो अशी जवळपास शून्य शक्यता आहे.मनातला एक विचार म्हणूनच आपण आपलं रूप बघत असतो. आपण आपल्या डोळ्यांनी हे जग बघतो पण आपल्याला बघायची सोय आपल्या शरीरात केलेलीच नाहीये ही जाणीव का होत नसावी?
थोडक्यात सांगायचं तर उसन्या आरशानी आपला चेहरा बघत तेच आपलं रुपडं आहे असं बघण्यापेक्षा यामागे या रचना असण्यामागे काय कारण असावं असा विचार करता करता एकदा एक अनुभव आला आणि माझ्यापुरतं मला उत्तर मिळत गेलं.
पावसानी तयार झालेल्या एका अतिशय छोट्या तळ्यात जाण्याचा योग आला आणि तिथेच तो अनुभव आला
पावसाचं पाणि एका जागी साचून तयार झालेलं ते तळं बरेच वळसे घेत,मोठ्या दगडांना न जुमानता एका दिशेनी जात होतं आणि ते दगड मागे गेल्यावर त्या तळ्याची लय जरा शांत झाली.
मी त्या तळ्यात उतरल्यावर साधारण घोट्यापर्यंत पाणी लागलं. सुरवातीला गार पाण्याची सवय व्हायला थोडा वेळ लागला मग मात्र ते पाणी हवं हवंसं वाटलं. काही मासे पायाशी येऊन घुटमळायला लागले आणि नव्याने आलेल्या पाहुण्याला चावून प्रसाद द्यायला लागले. आजूबाजूला फक्त पक्ष्यांचे आवाज होते आणि बाकी तशी शांतताच होती. मी थोडा झुकून पाण्याखाली असलेले दगड बघायला लागलो. अनेक आकारांचे आणि रंगांचे दगड पसरलेले त्यामध्येच एखादं हिरवं आयुष्य त्यातल्या एखाद्या दगडामध्ये स्थिरावलं होतं.
दगड पाहायला झुकल्यावर मला पाण्यावर तयार झालेलं प्रतिबिंब दिसलं आणि मी चमकलो.
मला माझा चेहरा प्रतिबींबाच्या रुपात पाहायची इतकी सवय झाली आहे की तो एक माझ्या शरीराभोवती तयार झालेला अगदी निराळा आकार जरा चकवा देणारा होता.आपल्याला जरी आपला चेहरा पाहायची सवय नसली तरी तो वेगळाच आकार माझा नाही हा विचार अगदी पहिल्यांदाच आला.
काही सेकंद तिथेच बघितल्यावर लक्षात आलं हा आकारही आपलाच आहे. हा चेहराही माझाच आहे. माझा आरशात दिसणारा चेहरा मला आरशात बघितल्याशिवाय दिसणारच नाहीये तर तो पुर्णपणे माझा आहे हे न पटणारं आहे हे त्या दगडांच्या चेहऱ्यानी दाखवून दिलं.
मी ज्यामध्ये मला बघीन तो माझा आकार तर नसेल?
अशा आकारांच्या मोहाचा नाश करणारा अनुभव जरा वेगळा वाटला.
आकार, चेहरे फसवे आहेत.
सर्वत्र एकजिनसी एकच अस्तित्व आहे.
कोणत्याही आकाराची अपेक्षा न ठेवता वावरणारं किंवा ज्यामध्ये मिसळेल त्याचा आकार घेणारं असं काही अस्तित्वात आहे.
देव?
मीही तसाच आकार घेतला आणि विचार केला तर मलाही आकाराची अपेक्षा नव्हती.
मी कोण?
देव?

तळ्यातल्या पाण्याचा अतिशय प्रसन्न आवाज.
Hello ajinkya khare mi aatach tumcha blog vachla . changla lihita tumhi. Keep it up