स्वरांचा आणि माझा संबंध तसा अलीकडचाच आहे.
म्हणजे सरांच्या घरी एका संध्याकाळी पाऊस पडत असताना अचानक सर भिन्न षडज वाजवायला लागले आणि मला पहिला स्वर समजला.
शुद्ध मध्यम.
सरांनी वाजवणं थांबवलं आणि मी लगेच विचारलं,
“सर मैंने जो सुना है वही है स्वर?ये आवाज बासरी से नहीं आ रही.”
“हां,बासरी तो एक लाऊड स्पीकर है,स्वर तो बजता ही रेहेता है हमेशा.”
तो स्वर थेट प्रत्येक पदार्थाला एक करून माझ्यासमोर आला.टाईम,स्पेस,कॉसेशन चे तुकडे पडले आणि मला त्या वेळी सगळीकडे फक्त तो एकच स्वर व्यापलेला आहे असं जाणवलं.
तेंव्हा समजलं स्वर म्हणजे एक विचार. आपल्याच डोक्यातून जन्माला आलेला.त्या आधी तो ‘आवाज’ होता फक्त.’स्वर’ व्हायला ती जाणीव लागते की तो एक विचार आहे.
नंतर प्रत्येक स्वर समजत गेला.प्रत्येक स्वराला ‘विचार’ अशी ओळख मिळत गेली.नंतर हेही समजलं की फक्त एकच स्वर आहे आणि बाकीचे सगळेच स्वर फसवे आहेत.प्रत्येक स्वरात फक्त एकच स्वर ऐकू यायला लागलां. मग नंतर समजलं की तोही एक स्वर फसवाच आहे.प्रत्यक्षात तोही स्वर खरा नाही.
एक दिवस पहाटे सरांनी तानपूरा जवळपास १.३० तासात लावला.तरीही त्यांचं पुर्ण समाधान झाल्यासारखं वाटलं नाही.थोडा अजून वेळ घेऊन त्यानी मला तानपुरा सोपवला.ते भैरवचा आलाप घ्यायला लागले आणि काही वेळातच मला स्पष्ट जाणवलं की बासरी, तानपुरा ही फक्त माध्यमं आहेत.
देवाची पुजा करायचं साहित्य.
तो एक स्वर जो सगळ्या स्वरांना जन्म देतो तो पुजारी आहे देवाचा.
देव तर प्रत्यक्षात नादरहीत आहे.
‘नाद’ स्वराला जन्म देतो असंच मला वाटत होतं पण त्या दिवशी मला नादाला जन्म देणारा अजून कोणीतरी आहे हे स्पष्ट जाणवलं.
त्यानंतरचे भाव मी नाहीच सांगू शकत शब्दात.
‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं म्हणलो आणि नंतर सगळंच मिळालं हे जाणवलं.रिकामा झालो.
आता कशातच मन रमत नाही.ताना नकोत,राग नकोत काहीच नको.खरं संगीत त्या शांततेत आहे.एका लयीत प्रवास करणारी ही शांतता निसर्गात पुरेपूर भरलेली आहे.
पक्षी ज्या लयीत रमलाय त्याच लयीत एखादा झरा वाहतोय आणि त्याच लयीत एखादं पान वार्यानी उडतंय.
संगीत माध्यमातून व्यक्त होतं म्हणजे नदीचं पाणी बाटलीत भरतो तसंच अगदी.
नदीचं पात्र म्हणजे ते अनाहत स्वर. उडी मारल्याशिवाय अनुभवाला न येणारे.
पण संगीत त्या नदीच्या उगमाजवळ आहे.
तिथे जावं,अनुभव घ्यावा आणि शांत व्हावं.
याला साधना लागते.विचारांची बैठक लागते.पण पुढचं काम फक्त आणि फक्त गुरूच करू शकतो.
आपण तिथे गेलो की तोच आपल्याला पुढचा रस्ता सांगतो.गुरूकडे गेल्यावर प्रश्न राहातच नाहीत.उत्तरं लगेच मिळतात.
माझ्या नशिबात असे गुरू मला मिळाले.
मला पुढचं सुचत नाहीये लिहायला.
सर तुम्हाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा.
??

अप्रतिम. सरांच्या सहवासात अर्धा तास जरी घालवला तरी आयुष्यभाराची ओंजळ भरुन आल्यासारखं वाटतं.
सरांचा सहवास. सुरांचा सहवास. कोटी कोटी प्रणाम आणि अनंत शुभेच्छा.