गाण्यातला सूर्यास्त…
ती वादळापूर्वीची शांतता असते तसं वादळानंतर ही एक शांतता असते.
एक काळ असा होता जेव्हां मनात प्रचंड कल्लोळ असायचा. प्रश्न असायचे आणि उत्तरं सापडली नव्हती.
अभ्यास सुरू केला तरीही तगमग थांबत नव्हती. एकेकाळी कट्टर हिंदू म्हणवून घ्यायचो, पण अचानक नास्तिक विचार घर करायला लागले आणि कट्टर नास्तिक झालो.पण त्यानी प्रश्न संपले नाहीत फक्त लपले.मग पाटी कोरी करून परत एकदा अभ्यासाला लागलो.हिंदू धर्मात जे काही विचार आहेत ते सगळे पालथे घातले. त्यानंतरही मनाला शांतता नव्हतीच.
पूर्ण समाधान नव्हतं. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली पण नवीन प्रश्न तयार झाले आणि मन अजून अशांत झालं.
यात बरेच विचार येऊन गेले त्या तपशिलात जात नाही.
मग एकदा साधारण अशाच एका संध्याकाळी अचानक सगळंच थांबलं.
सर्वसाधारण दिवस होता काही वादळ नाही आवाज नाहीत, आकाशवाणी नाही,कोणी देव आला नाही, पांढरा प्रकाश आला नाही,मी ध्यानाच्या अवस्थेत हवेत गेलो असाही काही प्रकार घडला नाही.पातळी वाढली नाही.फक्त तो एक सेकंद सगळं पॉज झाल्यासारखं जाणवलं आणि बास त्यानंतर प्रश्नच राहिले नाहीत.
याला साक्षात्कार म्हणा नाहीतर अजून एखादी फॅन्सी टर्म वापरा पण त्या एका क्षणानी एक नवीनच माणूस जन्माला आला.
हे सगळं इतकी वर्ष सुरू होतं आणि त्या एका सेकंदाने अाधीचं सगळं नष्ट झालं.
तो एकच सेकंद मी मला ओळखलं आणि माणसाला आयुष्यात मिळवायचं परमोच्च ध्येय सांगितलंय ते मिळालं.
या सगळ्याचा या रागाशी संबंध आहे म्हणून सांगितलं.
फार पूर्वी एकदा वसंतरावांचा मारवा खूप भारी असतो म्हणून ऐकलेला पण मला तो तितका भावला नाही.
मुसलमानी विकृती धारण केलेलं ते गाणं मला भावलेलं नाही हे जाणवलं तरी कारण मात्र कळलं नाही. तेव्हा स्वरांची जवळून ओळख नव्हती आणि त्यामुळे त्या रागाविषयी अढी मनात तयार झाली.
मग मगाशी बोललेल्या एका सेकंदाच्या बदलांनी स्वरांचीही ओळख झाली आणि मग एकदा संध्याकाळी मारवा अनुभवायला मिळाला आणि धन्य झालो.
वसंत रावांची शैली कशी हा चर्चेचा विषय बाजूला राहुदे पण त्यानी गायलं त्यात मारव्याचे अर्धे रंग दिसले हे नंतर लक्षात आलं
मारवा हा अतिशय चंचल राग आहे, रेस्ट लेस. पण ज्यांना तो अर्धा कळलाय त्यांना मारवा तसा जाणवतो.
मारवा मला गीतेचा,
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति
हा श्लोक शिकवून गेला.
मारवा म्हणजे शांततेपूर्वीचं वादळ,मनातले प्रचंड कल्लोळ, आपापल्या सहज धर्मानुसार,प्रारब्ध भोगण्याची शिक्षा मिळालेला जीव, ज्ञानी असून बंधनात राहावं अशी व्यवस्था म्हणजे मारव्याचा एक भाग.
पण कृष्ण म्हणतात हट्ट करून काय होणारे?हे असंच तर आहे. सिम्पल.
कशाला त्रास करून घेतोस…
बास, हे मारव्याचं दुसरं अंग.
धैवत रिषभ निषाद गंधार आपल्याला मारव्याचं पहिलं अंग दाखवतात.
वादळ दाखवतात,ती चंचलता दाखवतात,प्रश्न दाखवतात.पण तो षडज लागला की मारवा समजतो.
ते एक सेकंद आणि तो षडज सगळी तळमळ थांबवतात.वादळानंतर शांतता पसरते.परत कधीच वादळ येऊच शकत नाही.
हा मारवा त्या संध्याकाळी जाणवला.
आणि तो सुर्यास्तही जाणवला.
अनुभवायला मिळाला.
सूर्योदय, सूर्यास्त वेगळे नाहीतच हे समजलं.
आपण फिरत होतो हे लक्षात आलं.
सूर्य तोच षडज आहे आणि सूर्यास्त मारवा.

मारवा चा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो.. सुंदर वर्णन
धन्यवाद प्राची