साधारण चार वाजल्यानंतर मी आश्रमातून बाहेर पडलो.या आश्रमातून डावीकडे गेल्यानंतर थोडसं पुढे गेलं की मी जिथे राहायला होतो तो आश्रम सोडला की मुख्य शहर आणि मंदीराकडे जायचा रस्ता आहे तिथे जायला निघालो.रिक्षानी दहा मिनीटांवर असणारा रस्ता पायीच पार करायचा असं ठरवलं. आज पहाटे ज्या रस्त्यानी आलो तोच रस्ता अगदी वेगळा होता.ठिकठिकाणी लुना गाड्या दिसत होत्या,अनेक सायकली होत्या.चहाची अनेक केंद्र होती.काही इडली,डोसा मिळणारी छोटी छोटी उपाहार गृहं होती जिथे असं काही मिळत असेल असं त्यांच्या बाह्यभागावरून वाटतंच नव्हतं.खरं तर घरांच्या बाहेरच अशी ठिकाणं होती.अगदी सुरूवातीला तुम्हाला भाषा वेगळी वाटते नंतर त्या भाषेची सवय होते. मग ती भाषा कुठेही दिसली तरी वेगळी वाटत नाही.जर तिथे अचानक मराठी दिसलं असतं तर मात्र अगदी वेगळं वाटलं असतं.थोडं अजून पुढे गेल्यानंतर एखाद्य़ा अगदी सामान्य शहरासारखा भाग सुरू झाला.कपड्यांची दुकानं,किराणा दुकानं,हॉस्पीटल,मेडीकल अशा सगळ्या दुकानांनी तो भाग भरलेला.त्या रस्त्यावर चालत असताना माझ्या डावीकडे अरुणाचल पर्वत सतत दिसत होता. अगदी लक्ष जातंच असं वेगळंच त्याचं रूप आहे. मंदिरापासून काही अंतरावर आल्यावरच मंदिराची अतिभव्य तटबंदी मला मंदिराच्या आतमध्ये असणाऱ्या वैभवशाली संस्कृतीविषयी अतीव प्रेम उत्पन्न करायला भाग पाडत होती.मी एका गोपुरापाशी जाऊन थांबलो. ती मंदीराची मागची बाजू होती कारण तिथे अगदी कमीत कमी गर्दी होती.मी तिथुनंच आत गेलो.तामीळ शहरांची एक अगदी स्वाभावीक ओळख म्हणजे त्या शहरातलं मंदीर.बरीचशी तामीळ शहरं या मंदीराभोवतीच वसवली आहेत.चिदंबरम,मदुरै,कांचीपुरम,थंजावर,तिरुवन्नमलै,रामेश्वरम या अशा शहरांमध्ये शहराच्या मध्यभागीच एक अतिभव्य मंदीर दिसतं. ज्याच्या प्रत्येक दिशेला असलेल्या गोपुरांना भेट देणं ही एक शहराचीच प्रदक्षिणा असल्यासारखी आहे.भव्यता हा स्थापत्याचा प्रकार दक्षिणेकडे पुरेपुर पाहायला मिळतो.इथली सगळी प्रतीकं ही भव्य असली तरंच आपली समजली जातात.भव्यता हा इथल्या लोकांचाच स्थायीभाव झालाय त्यामूळेच कदाचीत लार्जर दॅन लाईफ गोष्टींची क्रेझ इथल्या लोकांमध्ये दिसते.सिनेमापासून देवांच्या मुर्तींपर्यंत भव्यता त्यांच्या रोजच्या आयुष्यात पाझरली आहे. ही मी वाईट गोष्ट आहे या अर्थानी सांगत नाहीये. मला तसं अपेक्षित नाहीये. आपल्याला या भव्यतेची सवय नसते म्हणून ती लगेचच लक्षात येते इतकंच. अगदी मंदीराच्या दारापासूनच या भव्यतेची कल्पना यायला लागली.त्या दारावर बरीच शिल्पं कोरलेली दिसली. संपूर्ण दगडात घडवलेलं ते मंदिर पहिल्यांदा बघताना मी भारावून गेलेलो. मंदिराच्या मुख्य दाराजवळ आल्यावर मी थबकलो.मंदिरामध्ये प्रवेश करतानाच असलेल्या अतिभव्य गोपुरावर असलेल्या विविध नक्ष्यांनी मला हिप्नोटाईझ केलं.आतमध्ये थोडं चालत गेल्यावर मला त्या भव्यतेची कल्पना आली.साधारणपणे २५ एकर मध्ये पसरलेला मंदिराचा परिसर चार दिशेला असलेल्या चार गोपुरांमध्ये नांदत होता. त्यातलं एक गोपूर ११ मजली आहे आणि ते बघताना आपल्याला शब्द सुचत नाहीत.
मुख्य दरवाजातून आत गेल्यावर मला नंदीचं दिसला. त्या नंदीच्या चेहऱ्यावर असलेले शांत भाव एखाद्या आदर्श भक्तासारखे दिसले.आपल्या प्रिय देवासमोर ध्यानाला बसलेला तो योगी मला माझ्या विस्कळीत आयुष्याची दिशा ठरवायलाच जणू सांगत होता. मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी सुंदर शिल्पं साकारलेली. एक अतिशय मोठं तळं तिथे होतं.खरं तर संपुर्ण मंदीर बघायला बराच वेळ जाईल आणि उशीर होईल या भितीनी मी थेट मुख्य मंदीरात जायचं ठरवलं. महादेवाच्या पिंडीच्या इथलं वातावरण वर्णन करण्याच्या पलीकडचं होतं.तिथे वेगळ्याच प्रकारची शांतता होती आणि शांततेचेही प्रकार असतात हे मला तेंव्हा अनुभवायला मिळालं.तिथेही प्रचंड मूर्ती होत्या.गडद काळ्या पाषाणात घडवलेल्या त्या मूर्ती मंदिराचं प्राचीनत्व जपत होत्या.पणतीचा प्रकाश त्या वातावरणाची शांतता अबाधित ठेवायला मदत करत होता. इतका वेळ माझं लक्ष मंदिरातल्या या चमत्कारांकडेच असल्यामुळे मला तिथे मनुष्यप्राण्यांचा वावरंच जाणवला नव्हता.मंदिरात येणारे भाविक तसे तुरळकच होते.
मी देवाला नमस्कार करून थोडा वेळ तिथेच बसायचं ठरवलं.नमस्कार जरी त्या देवतेला केला असला तरी त्यामागे प्रचंड भावनांची भक्ती जोडली होती हे फक्त त्या देवालाच समजलं असणार.मी नमस्कार केला त्या थोर विभूतींना ज्यांनी या मंदिराची निर्मिती केली.मी त्या भक्तांना नमस्कार केला ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा विसर पडेपर्यंत आपल्या प्रिय देवतेला हृदयावर कोरलं.मी माझ्या प्राचीन संस्कृतीला नमस्कार केला ज्यामुळे मला आज या सगळ्याचा अनुभव घेता आला.मी त्या थोर नंदीला नमस्कार केला जो राजयोग्यासारखा मला अधिकाधिक उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील होता.मी माझ्या आई बाबांना नमस्कार केलं ज्यांच्यापोटी जन्म घेऊन मी आज हा दिवस पाहायला तिथे उभा होतो.भावनांच्या लाटांमध्ये काही क्षण विरल्यावर मी भानावर आलो.पहिल्यांदा झालेलं ते दर्शन अगदी अविस्मरणीय ठरलं. त्या दिवशी अजिबात गर्दी नव्हती कारण गर्दीची व्यवस्था करण्यासाठी तिथे लोखंडी बार रचले होते ज्यामधून रांग आतमध्ये दर्शनासाठी जाऊ शकेल. त्या व्यवस्थेवरूनच तिथे किती गर्दी होत असणार याची कल्पना आली.सुदैवानी त्या दिवशी मी थेट काही लोखंडी बार पार न करता थेट आतल्या बाजूला जाऊन थांबलो जिथे काही माणसं होती.मुख्य मंदीरात प्रवेश केल्यावर मी काही वेळ इकडे तिकडे पाहातच बसलो इतका तो मोठा परिसर होता.आतमध्ये ठिकठिकाणी समया होत्या ज्यात दिवे लावलेले.पिवळ्य़ा दिव्यांनी चांगला प्रकाश बघायला मिळाला. ट्यूबच्या प्रकाशात ती मजा आली नसती हे अगदी पहिली समई पाहिल्यावरच समजलं. मंदीरामध्ये एक पालखी ठेवलेली जी उत्सवाच्या वेळेला उपयोगात आणली जात असणार.आतमधल्या सगळ्या मुर्ती काळ्या दगडातल्या होत्या.काही मुर्त्यांचे भाव अतिशय सुंदर होते.माझ्यापुढे काही तुरळकच माणसे होती.रांग थोडी थोडी पुढे सरकत असताना अचानक थांबली आणि तेव्हा समजलं की आता आरती आहे.आरती झाल्याशिवाय रांग पुढे सरकणार नाही.अशीच दहा पंधरा मिनीटं अनेक चमत्कारीक माणसे पाहील्यावर चॉघड्याचे आवाज आले. अनेक समया लावण्यात आल्या आणि आरती संपन्न झाली. आरतीनंतर गर्दी पांगली आणि मी थेट महादेवापाशी गेलो.गाभाऱ्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका मोठ्या समईशेजारी एका शांत जागेत स्थिरावलो.
आपसूकच डोळे मिटले गेले आणि आतमध्ये डोकावायला सुरवात केली.किती वेळ झाला याचं भान असायचं काहीच कारण नव्हतं आणि कोणत्या जागेत आपण आहोत हेही समजायचं काहीच कारण नव्हतं.श्वास सुरु आहे नाही याची फिकीर नव्हती.विचार बहुतेक नव्हतेच.अचानक माझ्यासमोर तो आतला संपूर्ण परिसर आला.काहीतरी वेगळं घडल्याने माझं लक्ष विचलित झालं पण मला कोणीतरी बांधून ठेवून जे दिसेल ते पहायची सक्ती करतंय असं माझं शरीर जेरबंद झालं.मला ठरवूनही हालचाल करता येत नव्हती.मी नकळत त्या गाभाऱ्याकडे ओढला जातोय असं मला जाणवलं. ‘मी’ कोण होतो हे मला आत्ताही नीट सांगता येणार नाही कारण मी आत्ता जे सांगतोय त्यामध्ये शब्दांची मर्यादा आहे आणि तो अनुभव अर्थातच शब्दांच्या पलीकडचा होता.मी शंकराच्या पिंडीच्या नजरेनी ते दृश्य पाहतोय असं मला जाणवलं.तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती मला दिसायला लागली.त्या व्यक्तींचे कपडे त्यांच्या हातातली पुजेची ताटं,नारळ,हार,फुलं,पैसे सगळं सगळं मला दिसायला लागलं.प्रत्येक अन प्रत्येक हालचाली मला जाणवायला लागल्या.प्रत्येकाची भक्ती व्यक्त करण्याची पद्धत मला अगदी स्पष्टपणे जाणवली. प्रत्येक जण आपापल्या विवंचना घेऊन काहीतरी मिळवायच्या इराद्यानी तिथे आलेला जाणवला.प्रत्येकाची याचनेची पद्धत त्याच्या स्वभावाबद्दल बरंच काही बोलून जाते.काही जणं नुसतंच ‘देव’ या संकल्पनेला घाबरून दर्शनाला येतात आणि गोंधळलेल्या अवस्थेत भितीचं दर्शन घ्यायचं का तिथे असलेल्या सकारात्मक उर्जेला बघायचं या गोंधळात असतात.काही फक्त आपलं काम होऊदे बास,या विचारानी झपाटल्यासारखं दर्शन घेतातकाही जण नमस्कार करत होते तर काही भजन म्हणत होते काही फुलं उधळत होते तर काही दानपेटीत चिल्लर टाकत होते.माझं लक्ष त्या प्रत्येकाकडे वेधलं गेलं.त्यानंतर असं किती वेळ झालं मला सांगता येणार नाही पण त्यानंतर माझे डोळे उघडले .त्यानंतर माझ्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडत गेल्या त्या प्रत्येकामध्ये या अनुभवाचाही विचार हा व्हायचाच.किंवा प्रत्येक घटना मी फक्त या अनुभावासारखी पाहायला लागलो. महादेवाच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वेगळेपणा,प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख,प्रत्येकाची भक्ती,प्रत्येक व्यक्तीच्या मनातले भाव यांचा समुच्चय हा त्या गाभाऱ्याच्या पायरीपर्यंतच पोहोचायचा.त्यानंतर ते भाव फुल जसं कोमेजून जातं तसे त्या गाभाऱ्याच्या पायरीवरच कोमेजून जायचे.असे हजारो लाखो व्यक्तींचे भाव हे मला त्या पायरीवर उदयाला येऊन अस्ताला जाताना दिसले.कितीकिती भावना त्या नमस्कारात सामावलेल्या.त्या सगळ्या भावनांच्या कल्लोळाकडे त्या गाभार्यातून फक्त एकाच दृष्टीनी पहिले जायचे.अनासक्तीने.मला तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना त्या भक्तांसारखी आहे.प्रत्येक घटनेची एक स्वतंत्र ओळख आहे.अस्तित्व आहे.प्रत्येक घटनेत भावनांचा समुद्र आहे.मला फक्त त्या घटनांचा परिणाम हा त्या गाभाऱ्याच्या पायरीपर्यंतच येऊ द्यायचाय. कोणत्याही घटनेकडे काठावर बसून नदीच्या प्रवाहाकडे बघणाऱ्या एका अनासक्त योग्यासारखं आयुष्य भोगायचं आहे हे मला त्या अनुभवानी शिकवलं.
‘ न मां कर्माणि लिम्पन्ति’ हे मी शिकलोय तरीसुद्धा त्याचा असा प्रत्यक्ष साक्षात्कार माझं आयुष्य बदलून गेला. आपण या संपुर्ण पसाऱ्यात एक अतिशय छोटा बिंदू आहोत तरीसुद्धा आपल्यातच या जगाचा विशाल फेसाळता समुद्र पसरल्याचा भाव निर्माण झाला.या समुद्राची एक लाट म्हणजे एक आयुष्य,तीच लाट परत समुद्रात मिसळणं म्हणजे मृत्यू.
त्या लाट बनून आलेल्या समुद्राचा.
समुद्र तसाच आहे.
अनासक्त.

लेखकाच्या नजरेतून अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुटत नाही..आणि अश्या छोट्या छोट्या गोष्टींच्या अनुभवातून माणूस कसा समृद्ध होतो हे वाचताना जाणवलं..
खूप छान..
All the best !