बॅंगलोर तिरुवन्नमलै प्रवास तसा ४ ५ तासांचा आहे.दिवसा बॅंगलोरहून निघालं की कृष्णगिरी येईपर्यंत नॅशनल हायवे आहे तिथून एक फाटा आहे तिथूनच पुढे तिरुवन्नमलैला जायला रस्ता आहे.
बॅंगलोरला तामीळनाडू ट्रांस्पोर्टच्या बस सॅटेलाईट नावाच्या स्थानकावरून निघतात.कदाचीत तिथूनच मैसूरलाही जायचा रस्ता असावा. सॅटेलाईट स्थानक बॅंगलोर विमानतळापासून तसं बरंच लांब आहे,आणि बॅंगलोरची रहदारी पाहता २ तासही सहज लागू शकतात.विमानतळातून बाहेर आलं की आपल्याला बस मिळतात ज्या मॅजेस्टीक किंवा थेट सॅटेलाईटलाही सोडतात.
सॅटेलाईटला तामीळनाडू राज्याच्या बसेस असतात त्यातल्या काही सेलम,पुद्दुचेरी,उटी,थ्रिसूर,त्रिची, तिरुवन्नमलै आणि क्वचीत मदुराईपर्यंतही जातात. त्यातली तिरुवन्नमलै बस जी थेट तिरुवन्नमलैला जाते आणि पुद्दुचेरी बस या दोनच बस तिरुवन्नमलैला जातात. बस तशा मुबलक प्रमाणात असतात आणि एखादी चुकली किंवा गर्दी जास्त असेल तर सोडाविशी वाटली तरी काही फरक पडत नाही.
सॅटेलाईटला एखाद्या कानडी माणसाला विचारलं तर तो तिरुवन्नमलैच्या बस कुठे आहेत ते बोटानी दाखवतो किंवा नुसते इशारे करतो.कानडी ड्रायव्हर कंडक्टर तामीळ बस विषयी मनात राग धरून असतात हे आपल्याला त्यांच्या माहीती देण्यावरून सहज समजतं.काही अपवाद वगळता बॅंगलोर मधील लोक पत्ता सांगताना उगीचच चिडतात किंवा त्रागा करतात. आपण पत्ता विचारल्यानी यांचा अकाउंट बॅंलन्स कमी होणार असल्याचा मेसेज आलाय का काय अशी शंका येते.
“भय्या तिरुवन्नमलै बस?” झाले ५०० कट,
एक बोट दाखवल्यानी इतका कसा त्रास होतो समजत नाही. त्राग्याच्याही पद्धती आहेत. काही काही दुकानदार तर मी असे पाहीलेत जे सरळ खाली मान घालून आपण तिथे नाहीच बघायचं असं ठरवून टाकतात. काही काही त्रागा करत करत चुकीचे पत्ते सांगतात.काही सरळ नाही माहीत सांगून टाकतात.मला वाटायचं पुणेरी लोकांची उगीचच अपकिर्ती होते.पुण्यातलं कोणीही असं करताना मी पाहीलं नाहीये.हा आता अभिनव कॉलेजजवळ उभं राहून कोणी टिळक रस्ता कुठे आहे विचारलं तर त्याला हसणं नैसर्गिक आहे त्यात कुठे असा त्रागा नाहीये,किंवा एखाद्यानी खुन्या मुरलीधरांच्या इथे सदाशीव पेठ कुठे आहे विचारल्यावर त्याची चेष्टा करणं मी समजू शकतो,किंवा डेक्कनला कोणी नवीन माणसानी वाडेश्वर विचारलं तर त्याला नातुबागेच्या वाडेश्वरचा पत्ता सांगून प्रेमळ फिरकी घेतली तर ते सॉजन्याचं ठरेल असं बॅंगलोरची लोकं पत्ते सांगतात.त्यामूळे मी वेगवेगळे प्रयोग करून शेवटी आपल्याला बरोबर पत्ता कसा मिळेल याची एक पद्धत शोधून काढली आहे.
आपण बाहेरगावातून नवीन शहरात गेल्यावर सामान्यपणे जरा बुजून पत्ता विचारतो किंवा जरा जास्त अदबीनी विचारतो ते अत्यंत चूक आहे असं मला अनुभवानी लक्षात आलंय.
तिथे पत्ता विचारताना अदब वगैरे तर सोडाच पण जरा मस्तवालपणेच विचारावं लागतं आणि तरंच उत्तर मिळतं हे अनुभवाचे बोल आहेत.
“मॅजेस्टीक को कैसे जाना है भय्या बता सकते है?”
असं विचारलं की त्या लोकांचा त्रागा सुरू होतो.
त्याच्या ऐवजी, मॅजेस्टीकला कसं जायचं सांग रे पटकन. असं मस्तवालपणे जरा चढ्या आवाजात विचारलं की सहज उत्तर मिळेल.बघा प्रयोग करून.
यावर काही सन्माननीय अपवादही असतील आणि तसलीच काही लोकं नेमकी हे वाचून माझ्या अंगावरही येतील,आम्हाला तर खूप चांगले अनुभव आले वगैरे,
चालेल तुम्ही भारी,मी कपाळकरंटा.एखादा मराठी माणूस काहीतरी चांगले सल्ले देतोय,तर तेही बघवणार नाही.
तर अशी मजल दर मजल करत तुम्ही सॅटेलाईटला आलात की तिथेच स्टॅंडवर चहा नाष्टा छान मिळतो.तिथलं स्टॅंडवर असलेलं हॉटेल अतिशय स्वच्छ आणि उत्तम पदार्थ मिळणारं ठिकाण आहे तिथे जरूर जावं.कदाचीत ते हॉटेल मैसुरच्या बसेस लागतात तिथे आहे. तिथून थोडं चालत जाऊन स्टॅंडवरच्या दुसऱ्या बाजूला गेलं की तामीळनाडू राज्याच्या भडक तपकीरी,पिवळ्य़ा बसेस दिसायला सुरवात होते. इथुनच आपल्याला त्या गडद,अंगावर येणाऱ्या रंगाची ओळख होते.तिथे बरीच गर्दी असते आणि बॅंगलोरहून रोज तामीळनाडूमध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रमाण तसं पुष्कळ आहे हे लक्षात येतं.हातावर पोट असणारे,मजूरीसाठी येणारे,रोजंदारीवर काम करून परत तामीळनाडूतल्या गावांमध्ये जाणारे,काही एजंट,सॉफ्टवेअरची काही तरूण मंडळी,माझ्यासारखे फिरायला बाहेर पडणारे असे तिथे गर्दी करून असतात.
तिथल्या कंडक्टरना एका सेकंदाच्या आत एका गावाचं नाव घेण्याची सक्ती असावी इतक्या भरभर ते नावं घेत असतात आणि ‘तिरुवन्नमलै’ असं विचारल्यावर ते जे नाव सांगतात आणि खूण करून जी बस दाखवतात ते नाव तिरुवन्नमलैच आहे याची २ वेळा खात्री करावी लागते मग कंडक्टरला परत तिरुवन्नमलै ? असं विचारावं लागतं मग तो ते अगम्य उच्चार करून परत सांगतो.तरी माझ्यासारख्याचं समाधान होत नाही मग मी खिडकीत एखाद्याला, तिरुवन्नमलै? असं परत विचारतो आणि आत शिरतो.कंडक्टरच्या हे लक्षात येतं आणि तो तामीळमध्ये, ‘आम्ही येडे’ असं म्हणत असावा असं वाटतं. पण खरंच तो उच्चार इतका वेगळा असतो की कळत नाही. ‘तिर्व्न्लै’ असा असतो साधारण उच्चार. आणि सेकंदांच बंधन असल्याने तो अतिशय पटकन कानावर आदळतो. मी पुण्याचा आहे त्यामूळे कुठला रे तु विचारलं की पुऽऽऽऽऽऽऽऽणेऽऽऽऽ. असं ऐसपैस, दोन हात वर करत आळस वगैरे देत नाव सांगायची सवय आहे त्यामूळे हे असं भयानक पद्धतीचं नाव कानाला दरवेळी कोडं देऊन जातं. तुम्हाला वाटेल मी इथे चेष्टा करायच्या हेतूनी हे लिखाण सुरू केलंय पण तसं नाहीये. मी ज्या अगदी तामीळ लाल गाडीनी जातो (महाराष्ट्रातली लाल गाडी असते म्हणुन लाल प्रत्यक्षात ती भडक तपकीरी असते) त्यातली लोकं खरंच खूप चांगली आणि साधी असतात. तोंडावर कदाचीत पोशाखी हसणार नाहीत किंवा अदब दाखवणार नाहीत पण मनानी सरळ असतात आणि प्रसंगी थोडा त्रास सहन करून आपल्याला मदत करायला मागेपुढे बघत नाहीत. शहरात येत असले तरी त्यांच्यावरचे संस्कार खेड्यातले आहेत हे लगेच दिसून येतं. कंडक्टरही अगदी साधे असतात.तिकीट देताना चेहरा न्याहाळतात आणि एखादी बॅग जर ठेवायला अडचण होत असेल तर स्वतः ड्रायव्हरच्या इथे ठेवायला जातात आणि आपल्यालाच आठवण करून देतात,
“सर,बॅग्गं……”
त्यांची नोटा हाताळायची एक वेगळीच पद्धत आहे.ते आपल्या बोटांमध्ये नोटा रचतात.१० २० ५० १०० अशा नोटा दोन बोटामधल्या जागेत ठेवतात.त्या नोटांची घडी घालतात आणि चक्क सुरळी करतात.
कानडी कंडक्टर जसे राईट असं ओरडून ड्रायव्हरला निघायची सुचना देतात तसे हे तामीळ कंडक्टर शीळ वाजवून त्यांना इशारा देतात.वेगवेगळ्या प्रकारची शीळ त्यांना वेगवेगळे इशारे सुचवत असते.
आपल्याला जर खरा भारत बघायचा असेल,खरा म्हणजे चांगला किंवा वाईट असं नाही तर जसा आहे तसा बघायचा असेल तर सरकारी वाहनांनी तिथल्या लोकांमध्ये राहून तो भाग फिरावा असं माझं मत आहे. बॅंगलोरहून खाजगी गाडी केली तर बॅंगलोर तिरुवन्नमलै प्रवास अगदी आरामदायी आणी सुसह्य होत असेलही पण या अशा बसेसनी जे बघायला मिळतं ती मजा त्या खाजगी गाडीत नक्कीच नाही, हाही अनुभवाचा भाग आहे.काय नसतं या प्रवासात, इतक्या प्रकारची माणसं आपल्याला बघायला मिळतात की त्यानीही आपलं अनुभवविश्व थोडं संपन्न होतं.कंडक्टर पासून इतर प्रवासी मंडळी आपापल्या स्वभावांचं प्रदर्शनच पुर्ण प्रवासभर आपल्यासमोर मांडत असतात तेही फक्त प्रवासाच्या तिकिटाचे पैसे असतील तेव्ह्ढ्यातच ! इतक्या प्रकारची माणसं अभ्यासणं यासारखा विरंगूळा नाही.इतकंच काय ड्रायव्हरची बस चालवण्याची पद्धत पण आपल्याला त्याच्या स्वभावाचे अनेक पैलू सांगून जाते. आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कधीकधी आपल्याला खूप काही शिकायला मिळतं या अशा प्रवासातून. लोकांच्या विवंचना पाहायला मिळतात,दुःख बघायला मिळतात,गरीबी बघायला मिळते, या सगळ्यावर मात करत खुलणारं हसू बघायला मिळतं. जगण्याची धडपड बघायला मिळते,भुक किती वाईट गोष्ट आहे याची जाणीव होते. भुकेसाठी खरंच कोण काय करत असतं हे बघितलं की आपण किती कमालीचे सुखी आहोत याची जाणीव मनाला दिलासा देऊन जाते आणि आपोआप आपण ज्या स्थितीत आहोत त्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होते.
या अशा अनुभवांनीच माणूस मोठा होतो असं वाटतं.
माणूस म्हणजे तरी नेमकं काय,या अशा अनुभवांचा सम्मुच्चयच.हे जितके समृद्ध तितका माणूसही प्रगल्भ.
एकदा तिरुवन्नमलैलाच एका अतिशय फाटक्या साधूला बिस्कीटं दिलेली तो प्रसंग आठवला,
त्याने ती बिस्कीटं तशीच तिथल्या माकडांना दिली. तो साधूही जेमतेम दोन वेळेचं पोट भरू शकेल असंही वाटत नव्हतं. भूकेसमोर भलेभले हारलेले पाहिल्यावर असा वेगळा प्रसंग मनावर कोरला गेला. आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालंय. फरक अनुभवांचा आहे.
……………………समान धागा.
Very nice! Keep it up!
Thank you amol!
खूपच छान…
Khup cchan Khare Shikshak…?
मस्त रे अजिंक्य असचं लिहीत राहा….
छान लिहिलंय.
सहज सुंदर लिखाण! येऊ दे अजून