4.पाऊस…………..लय

जगातल्या प्रत्येक माणसाकडे कशाचा तरी अभाव आहे आणि त्यामूळे हे जग सुरळीत सुरू आहे असा सर्वसाधारण नियम आहे.पण ते काहीतरी कमी असल्याची भावना मात्र प्रत्येकात अगदी काठोकाठ भरली आहे आणि त्यामुळे जग अव्यवस्थित यंत्रणा असल्याचा भास होतो आणि वेगवेगळ्या थिअरीजनी त्यावर उपाय शोधण्याचे फोल प्रयत्न केले जातात.जर हळूहळू आपल्याकडे कशाचातरी अभाव असणारच आहे हे सत्य प्रत्येकानी स्वीकारलं तर ही यंत्रणा व्यवस्थित आहे हे दिसायला लागतं.
मी तिरुवन्नमलैला येऊन असले विचार करत असतो असं नाहीये.उलट तिथे कमीतकमी विचार डोक्यात येतात आणि बाक़ी सगळा वेळ एखादी होडी नदीच्या प्रवाहाबरोबर जाते तसं शरीराला, मनाला एखादी न दिसणारी नदी बरोबर घेऊन जाते असं वाटतं. वेळेला तास मिनीटं सेकंदाच्या हिशोबात बसवल्यामूळे माझा तिथे दिवसभराचा कार्यक्रम काय असतो हा प्रश्न पडणं साहजिक आहे,मी तिथून निघताना जाणवतं काळ वेळ अशा काही गोष्टी अस्तित्वात आहेत.
उपाहारगृहातून निघाल्यावर मी आश्रमातून बाहेर आलो. बाहेर आल्यावर डावीकडे गेलं तर मंदीराकडे जायचा रस्ता आहे.उजवीकडे गेलं तर आश्रम आहे आणि तिथुनच पुढे गिरिवलमला जायचा मार्ग आहे.गिरिवलम म्हणजे प्रदक्षिणा. अरुणाचल पर्वताला प्रदक्षिणा घालून परत मंदीरात जाणं हे तिथे खूप भक्तीभावानं केलं जातं.काही ठरावीक वेळी म्हणजे पॉर्णिमा, प्रदोष अशा दिवशी हजारो लोकं प्रदक्षिणा घालायला येतात. काही जणं मंदीरापासून सुरू करून साधारण बारा किमी चालून परत मंदीरात येतात तर काही आश्रमापासून प्रदक्षिणा सुरू करून परत आश्रमात येऊन प्रदक्षिणा संपवतात.प्रदक्षिणा मार्गात वेगवेगळी लिंगं आहेत ज्यांना नमस्कार करून प्रदक्षिणा पार पाडली जाते.जर मंदीरापासून प्रदक्षिणा सुरू केली तर पहिल्यांदा अग्नीलिंगम येतं आणि आश्रमापासून सुरू केली तर तेच अग्नीलिंगम शेवटी येतं.गिरीवलम काही साधू सुक्ष्मरूपानी करत असतात असं महर्षी सांगायचे त्यामूळे तिथे अशी एक प्रथाच पडली आहे की सामान्य भाविकांनी रस्त्याच्या डावीकडून प्रदक्षिणा घालून रस्त्याच्या उजवीकडे असलेल्या सुक्ष्मदेही थोर पुरूषांना आदरानी उजवीकडचा मार्ग द्यायचा.तशाच एका साधूची एक गंमत एकदा पाहायला मिळाली त्याबद्दल परत कधीतरी लिहीन.त्या दिवशी गिरिवलमला तशी गर्दी नव्हती. मी आश्रमातून उजवीकडे वळालो.त्या आश्रमालाच लागून पहाटे जे चहाचं दुकान लागलं ते मागे पडलं.तिथे माझा मित्र कलंदर दिसला नाही त्याची जागा दुसऱ्या एकानी घेतली होती. ते दोघे आळीपाळीनी तिथे काम करत असावेत.मालक अर्ध लक्ष आत अर्ध बाहेर देत आतल्या एका माणसाशी जोरजोरात बोलत होता.पाऊस पडून गेल्यामूळे हवेत थंडावा होता.थोडं पुढे गेल्यावर पहाटे पाहिलेली चित्रपटांच्या जाहिरातींची स्पर्धा परत एकदा दिसली.एका भिंतीवर तर एकामागून एक अशा इतक्या चित्रपटांची पोस्टर लागलेली की आता यापुढे एक जरी पोस्टर तिथे लागलं तर ते सगळे कलाकार भिंतीतून बाहेर येतील असं वाट्लं.त्याला लागूनच एक फळविक्रेता ठाण मांडून बसलेला.फळं चांगली ताजी दिसत होती.संत्री,मोसंबी,द्राक्षं, भलीमोठी तामीळ केळी टांगलेली,एक वेगळंच फळही दिसलं जे आधी कधी पाहिलं नव्हतं. पेरूसारखं दिसणारं फळ प्रत्यक्षात पेरूच होता.तो माणूस परदेशी लोकांना वेगळा भाव सांगायचा आणि स्थानीक तामीळ लोकांना वेगळा भाव सांगायचा. एका हुशार परदेशी माणसाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानी अस्खलीत इंग्लीशमध्ये जाब विचारायला सुरवात केली. खोडी काढायच्या उद्देशानी मीही माझी मराठी भाषा रेटत तिथे जाब विचारायला सामील झालो.माझी मराठी त्या परदेशीचं इंग्लीश आणि तामीळ दुकानदाराचं तामीळ यामूळे मनासारखी खिचडी तयार झाली.यातून काय निष्पन्न होणार आहे याची निदान मलातरी कल्पना होती.त्या तामीळ दुकानदाराला मी काही घ्यायला आलो नाहीये असा संशय आला तसं मी लगेच ते पेरुसारखं दिसणारं फळ उचललं आणि खिचडीबर खोबरं टाकलं. परदेशी माणूस भांडत होता असं वाटतच नव्हतं म्हणून मी त्यालाही मराठीतून जरा आवाज चढवायचा सल्ला दिला.काही वेळ असा संवाद रंगल्यावर अचानक तामीळ माणसाला चुक लक्षात आली किंवा त्याला भिती वाटली आणि त्यानी योग्य भाव लावून क्षमा मागत त्या परदेशी माणसाची रवानगी केली. माझी खिचडी चांगली झाली पण त्या तामीळ चतूर दुकानदारानी मीठच काढून घेतलं.मी दहा रुपयाचे पेरू घेतले आणि माझा रस्ता धरला.
त्या फळवाल्याशेजारीच शहाळ्यांचा एक भलामोठा ढीग रचून एक काकू सपासप शहाळी कापत काही परदेशी माणसांना देत होत्या.परदेशी माणसं तिथे इतक्या संख्येनी असतात आणि ती इतकी मिसळतात त्यामूळे जरा आश्चर्यच वाटतं.ते आपली जगण्याची पद्धतही बदलतात.कदाचीत पहिल्यांदा पद्धतच बदलतात मग नंतर आतले बदल होतात असं वाटतं.परदेशी लोकं बाहेरचा आधी विचार करतात असा अनुभव आहे. एखादा माणूस काय सांगतोय हे ऐकताना पहिल्यांदा बाहेरच्या वर्तुळात काय घ्यायचं हे त्यांना लगेच भावतं.कोणत्याही परदेशी माणसाला भारतातला एखादा प्रांत दाखवला तर तो आधी तिथले पोशाख कसे आहेत बघेल,लोकं कशी राहतात,कसे कपडे घालतात,इथला काही वैशिष्ट्यपुर्ण पेहराव आहे का पाहातात आणि स्वतः तसे राहायचा प्रयत्न करतात. त्यामूळेच इथे कित्येक परदेशी माणसे अगदी तामीळ धोती नेसतात. पांढरे शुभ्र शर्ट घालतात.बायका तामीळ पद्धतीच्या साड्या नेसतात. गजरे माळतात.हे सगळं त्यांना अगदी महत्वाचं वाटतं.भारतीय बरोबर उलट विचार करतो असं बघायला मिळालय. कपडे,राहण्याची पद्धती आपण बदलू पण विचार सहसा पारखूनच घेतले जातात आणि इतर गोष्टींपेक्षा सगळ्यात जास्त महत्व विचारांना आपसुकच दिलं जातं असं सामान्यपणे बघायला मिळतं.तर ते परदेशी तामीळ पद्धतीनी राहात असल्यानी जरा वेगळेच वाटतात.
शहाळ्याच्या पुढे एका वाद्यविक्रेत्याची छोटी गाडी होती ज्यात बहुतेक सगळी जुनीच वाद्य मांडली होती. आपल्याकडून कोणी वाद्य घेईल असं कदाचित त्या विक्रेत्यालाही वाटत नसावं अशा प्रकारे तो अगदी शेजारीच खुर्ची टाकून आरामात बसला होता.येणारे जाणारे फक्त त्याच्या वाद्यांकडे बघत पुढे जात होते.तिथून पुढेच अगदी जवळच आश्रम होता आणि मी तिथेच जायला निघालेलो. वाद्य विक्रेत्याच्या पुढे एक लहानसं मंदीर होतं जे तसं बरंच जुनं वाटत होतं.मंदीरासमोर लोकांसाठी वाती लावायची व्यवस्था केलेली दिसत होती आणि एकंदरीत तो परिसर तेलानी माखला होता.काळ्या दगडात असलेलं ते मंदीर तेलामूळे चमकत होतं.धूप,तेल,कापूर,वाती यांचा एकत्र वास तयार झाला आणि तो त्या परिसरात चिकटला.तामीळ माणूस आपण जसा सामान्यपणे नमस्कार करतो तसा नं करता दोन्ही हात जोडून तो डोक्याला चिकटवतो आणि आपल्या इष्टदेवाचं नाव मोठ्यानी उच्चारतो, आणि दोन्ही हात कानाला लावून माफी मागितल्यासारखं करतो. त्यानंतर तिथला पुजारी त्याच्या हातात अंगारा देतो जो मळवट भरल्यासारखा कपाळाला लावला जातो. तामीळ लोकं गंधही आडवं लावतात तसा तो अंगाराही आडवा लावला जातो. आणि अंगाऱ्या बरोबर एखादं फुल भक्ताच्या हातात टेकवलं जातं. तामीळ दर्शन घ्यायची ही अगदी स्टॅंडर्ड प्रॅक्टीस आहे.याच्यात बदल म्हणजे फक्त तसा डोक्यावर हात ठेऊन साष्टांग नमस्कार केला जातो.बाकी हाच प्रोटोकॉल सगळ्या दर्शनांमध्ये पाळला जातो.असं केलं नाही की देवालाही चुकल्यासारखं वाटत असेल इतकं साम्य या दर्शनामध्ये आहे.तो तेलाचा भाग ओलांडला आणि थोडं पुढे गेल्यावर आश्रमाच्या दाराशी फुलवाल्या काकू होत्या तिथे थांबलो.मला आत जायचं होतं पण एक चहा घेऊन परत आत यावं असं का कोणास ठाऊक वाटलं आणि परत मागे फिरलो.

 

 

 

 

कलंदर तिथे नव्हता हे आधी लक्षात आल्यामूळे दुसरीकडे जायचं ठरवलं आणि थोडं मागे चालत आल्यावर त्या फळवाल्यासमोर एक चहाचं छोटं दुकान बोलावताना दिसलं.एका मोठ्या झाडाचा आधार आणि मागे भिंत याच्या मध्ये ते दुकान सुरू करण्यात आलेलं.त्या दुकाना शेजारी मोकळी जागा होती.दुकानासमोर लाकडी बाकडी टाकलेली जिथे एक परदेशी आजोबा चहा पित होते.गर्दी तशी अजिबातच नव्हती. त्या दुकानात मला बंब दिसला नाही आणि संशयानी मी आत डोकावलं तेव्हा लक्षात आलं तिथे तामीळ चहा मिळत नाही तर सामान्यपणे भारतात जसा चहा मिळतो तसाच मिळतो. तिथेही अनेक बरण्या होत्या ज्यात बिस्कीटं तुडूंब भरलेली.त्याच दुकानात दुधाचीही विक्री होताना दिसली.तो परदेशी माणूस सोडून तसं कोणीच तिथे नव्हतं.ती वेळ चहाची नव्हती किंवा त्या दुकानातच तशी गर्दी नव्हती. झाडाला लागून असलेल्या बाकडयावर बसलो आणि तिथल्या काकुंना चहा द्यायला सांगितला. त्यांना मला चहा हवाय हे कळलं का नाही ते कळायची सोयच नव्हती मी दोन तीन वेळा वन टी सांगितलं तरीही त्या काहीच उत्तर देत नव्हत्या मग मीच कंटाळून सांगणं सोडलं.
ती जागा तशी अतिशय शांत होती आणि जरा अलिप्तच होती.रस्त्याच्या कडेला असली तरीही रस्ता आणि ते दुकान याच्यामध्ये बरीच जागा असल्यामूळे रस्त्यावरची रहदारी,लोकांची येजा तशी तिथे जाणवत नव्हती. रस्त्याच्याच समोर शहाळ्याचे ढीग,वाद्यविक्रेता तो धुर्त फळवाला दिसत होते पण त्यांची दुकानं रस्त्यावरच असल्यासारखी होती.काही मिनिटातच मी ठरवलं की इथे ठाण मांडूनच बसायचं आणि तशी तयारी सुरू केली.कानात हेडफोन टाकले,लिहिण्यासाठी डायरी आणि पेन काढलं आणि आपलंच दुकान असल्याच्या थाटात तिथे एका पाठही टेकवता येईल अशा एका बाकड्यावर जाऊन स्थिरावलो.आधी ठरवून मग लिहीणं असं कधीतरीच झालंय एरवी हे असं उरफाटं लिखाणंच मी करत असतो.कानात यिरुमाचा पिआनो सुरू झालेला आणि माझ्या मेंदूत शिरून त्यानी माझे विचार भराभर कागदावर उतरवायची घाई करायला सुरवात केली.पिआनोचं आणि माझ्या मेंदूचं काय नातं आहे मला समजलं नाहीये.लिहिताना पिआनो असेल तर मला एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा आनंद मिळतो.माझ्या थेट डोक्यात तो वाजत आहे असं वाटतं.पिआनो खरं तर तुटणाऱ्या लयीचं वाद्य आहे मला त्यानी लिहायची बुद्धी कशी होते याचं उत्तर मी शोधतोय. अजून तरी मिळालं नाहीये.माझे विचार ती तुटणारी लय भरून देत असावेत असाही एक अंदाज आहे.पण आमचं चांगलच जमतं हे खरं आहे.काही वेळात तिथल्या काकूंनी चहा आणून ठेवला.त्यांनी हाक मारून चहा घेऊन जा असंही सांगीतलं असावं कारण त्या वैतागलेल्या वाटल्या. हेडफोनमूळे मला ऐकू येण्याची शक्यता नव्हतीच.मी परत एकदा लिखाणात शिरलो.चहा तामीळ चहासारखा नसला तरी काही उत्तम चहांपैकी तो चहा होता.त्या त्या वेळी तो तो चहा चांगला वाटतो तसंही असेल.त्या वेळी तो चहा अगदीच परफेक्ट होता.मी माझ्या पुस्तकासाठी ‘प्रोफेसर’ असं एक पात्र रंगवत होतो त्या दिवशी त्याच प्रोफेसर या पात्राबद्दल लिखाण सुरू होतं.चहाचे घोट घेताना मनात जे विचार येतील ते मांडले जात होते.कानात हेडफोन पिआनो ऐकवत होता.तीन ते चार कप चहा प्यायला हेही मला समजलं नाही आणि चहाच्या कपांचा ढीग जमला तेंव्हा त्या काकुंची मुलगी मला ते कप दिसतील अशा प्रकारे ते ऊचलायला आली.तरीही माझं लक्ष तिथे गेलं नाहीं. माझं लिखाण सुरू होतं. आणखी थोड्या वेळानी माझ्या लक्षात आलं की हवेत इतका वेळ असलेलं ऊन आता नाहीये आणि सकाळी जसा पाऊस पडला तसं वातावरण बदललं आहे. आकाशाकडे लक्ष जायचा प्रश्नच नव्हता नाहीतर आकाशातले ते ढग समोर जशी शहाळी ठेवलेली तसे अगदी खेटून बसलेत हे लक्षात आलं असतं. त्यानंतर जे घडलं ते एका कॅनव्हाससारखं डोळ्यासमोर आहे. अनुभव ‘ग्रहण’ ते अनुभव ‘कथन’ यात जी काही हानी होईल ती खूप मोठी असेल इतकं काही अद्भुत त्या प्रसंगात होतं.
सुरवात झाली त्या शहाळ्यांसारखी गर्दी केलेल्या ढगांकडे लक्ष जाण्यानी.हा सकाळसारखा पाऊस असेल असं वाटलं नाही त्यापेक्षा ही सर निश्चीतच मोठी असणार हे समजल्यावर मी माझं लिखाण थांबवून सावरून बसलो.एरवी पाऊस सिनेमा बघतो तसा बघितल्याचं लहानपणानंतर त्याच दिवशी घडत होतं.पाऊस येणार ते पाऊस येऊन गेला असा तो सिनेमा सुरू व्हायला काही मिनिटंच शिल्लक असल्याचा अंदाज माझ्या आधी घेतलेली मंडळी गडबडीत आपापलं सामान गुंडाळायला लागली. समोरचे दुकानदार पावसापासून बचावासाठी ताडपत्री प्लॅस्टीक असं सामान शोधून आडोसा करण्यात गुंतले.रस्त्यावरून अचानक घाईगडबड दिसायला लागली. चालणारी माणसं जरा झपझप चालायला लागली.मी ज्या दुकानात बसलेलो त्यांनीही पावसासाठी केलेली व्यवस्था उलगडायला सुरवात केली.
पाऊस पडायला लागला आणि माझा सिनेमा सुरू झाला.
आपण जे बघतो ते सगळं ‘आठवण’ या स्वरूपात आपल्या मेंदूत साठवलं जात असतं जर ते साठवलं न जाता आपण प्रत्येक क्षण तसाच जगला तर ते जगलेले प्रत्येक क्षण हे आधीच्या क्षणांपासून वेगळे असतील.त्यात एक निरागस नाविन्य असेल.’आत्ता’ म्हणजे ‘या क्षणी’ असं न होता संपुर्ण मीच ‘आत्ता’ होणं.त्या तशा ‘आत्ता’ ला वेळेची मर्यादा नसेल.वेळेच्या मापानी हे ‘आत्ता’ न मोजता ते ‘सर्वस्व’ या मापानी मोजलं जाईल. असे ‘आत्ता’ जितके जास्त जगू तितकं आपण ‘जगू’.
त्या दिवशी मला तशाच एका ‘आत्ता’ ची ओळख झाली.
पावसाचा एक एक थेंब वेगळा करता येईल इतपत पाऊस सुरू झाला.थेंब येत होता आणि जमिनीत मिसळत होता. असे अनेक थेंब आले आणि जमिनीत मिसळले. मातीवर ते थेंब पडल्यानं वास यायला लागला.काही सेकंदातच त्या एकेका थेंबा ऐवजी अनेक थेंब असेच येऊन मातीत मिसळायला लागले.त्या वेळी माझ्या काळाचा हिशोब चुकला आणि एक अद्भुत रोमांचक प्रसंग मला दिसला. सेकंदाचे शेकडो तुकडे पडले आणि एक एक गोष्ट अतिशय शांतपणे मला बघता यावी म्हणून घडत्ये असा आभास झाला.ती सर आली आणि आजूबाजूच्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींचा तिनी अलगद ताबा घेतला. मला एक एक थेंब वेगळा होऊन दिसायला लागला.त्याचा आवाज ऐकू यायला लागला.सुरवातीला जे थेंब एक एक असे येत होते आणि आत्ता सगळे मिळून येत होते त्यातला फरक दिसला,जाणवला,ऐकू आला.प्रत्येक थेंबाची विशिष्ट गती मला त्या गती सारखीच जाणवली.जणूकाही मीच आकाशातून खाली येऊन एखाद्या मातीच्या गोळ्यावर आदळतोय असा विलक्षण भ्रम तयार झाला.थेंबाची गती अनुभवल्यावर मला सामुहीक गती समजली.प्रत्येक थेंबाची आणि थेंबांच्या समुहाची गती वेगळी होती हे दिसलं.मला ‘लय’ काय असते हे दाखवण्यासाठी असा प्रत्येक थेंब सिद्ध झालेला. लय म्हणजे गती,आघात असं काही असेल असा समज तेव्हा गैरसमज आहे हे समजलं. एक एक थेंब एका विशिष्ट लयीतच खाली येत होता. थेंबांचा समुह एका ठरलेल्याच लयीत जगत होते.ही या पावसात दिसलेली लय मला तिथल्या प्रत्येक कणात दिसायला लागली.सगळ्यात आधी ‘मी’ एक शरीर बनून माझी लय बघीतली. समोर असलेल्या प्रत्येक सजीव निर्जीव तत्त्वाची लय त्या सेकंदाच्या कपाटात रचलेली प्रत्यक्ष दिसली.शहाळ्यांवर एक मोठी पिवळी ताडपत्री झाकलेली त्यावर पावसाचे थेंब जोरजोरात आदळत होते आणि ताडपत्रीमध्ये थोडा वेळ थांबून खाली वाहात होते.हे सगळं अगदी आखून दिल्यासारखं चालू होतं.शेजारचा वाद्यविक्रेता कधीच सगळं चंबूगबाळं आवरून पसार झालेला.त्याच्या दुकानाच्या पत्र्यावर थेंब पडून एक ध्वनी तयार झालेला ऐकू आला.ती यंत्रणाही लयीचं एक रूपच सांगत होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पाणी वाहात होतं जिथे दगड असेल तिथे एक वेगळा रस्ता तयार करून पुढे जाण्याचं काम बिनबोभाट सुरू होतं. मोठ्या झाडांवर पावसाचा परिणाम झालेला लक्षात येत नव्हता पण त्यानी एक अतिप्रचंड आवाज निर्माण झाला ज्याची एक अर्थातच लय होती. झाडाच्या पानांवर थेंब जमत होते आणि तिथुनच खाली टपकत होते.त्याची एक ठरलेली मर्यादा होती. एक पॅटर्न होता. तो पॅटर्न कधीही चुकला नाही.त्यात सुंदर भाव होते.आनंद होता.

एकडे तो धुर्त फळवाला आपली फळं नीट झाकली आहेत हे बघून समाधानानी सिगरेट ओढत एका आडोशाला उभा होता.अनेक चालणारी माणसं मिळेल त्या आडोशाला थांबून पाऊस थांबायची प्रार्थना करताना दिसली.काही माणसं पाय आदळत छपाक छपाक असा आवाज काढत पाण्यातूनच वाट काढत पळत जात होती. आश्रमाच्या पुढून एक बस भरधाव वेगानी येताना दिसली.वळणावरून येणारी ती बस एखाद्या अजस्र हत्तीसारखी मान हलवून पाणी खाली टाकत निघून गेली.त्या बसवर थेंब पडत असल्याचा आवाज ऐकू आला.खिडक्यांमधून काही तुषार आतमध्ये शिरताना दिसले.एक दोन दुचाकी भरधाव वेगानी जाताना पाऊस कापत गेल्या.समोरच्या मंदीराजवळ एक कुत्रं आडोशाला थांबून अंगावरचं पाणी दोन्ही बाजूनी हालत खाली टाकत होतं. त्याच मंदीराजवळ आई आणि मुलगी थांबलेले.ती लहान मुलगी त्या कुत्र्याकडे बघत आईच्याच कडेवर हालत हालत त्याची नक्कल करत होती.हीच ती लय होती ज्याला फक्त संगीतापुरतं मर्यादीत करायचा हट्ट मी चालवला होता. लय त्यावेळी प्रत्येक कणात असलेली पाहिली. निरनिराळ्या लयींचा एकत्र आविष्कार म्हणजेच आपलं अनुभवविश्व हे त्या पावसाच्या कृपेनी ‘आत्ता’ होऊन पाहिलं.लय म्हणजे गोलाई जी निसर्गाच्या प्रत्येक कणात अस्तित्वात आहे. ही गोलाईच आपल्याला दिसत नाही आणि आपण हे सगळं ‘सरळ’ आहे असं समजून आपले अनुभव मर्यादीत करतो.त्या दिवशी जेंव्हा ही गोलाई काय आहे हे थेट समजलं तेव्हा लय सापडली. मग संगीतातली लय काय आहे हे झटक्यात समजलं. साधं शहाळ्यांवरच्या थेंबामध्येही ती गोलाई ओतप्रोत भरलेली एरवी कधी समजली असती?गोलाई म्हणजे फक्त दॄष्य स्वरूपातलं लयीचं रूप झालं.हीच लय जेंव्हा ध्वनीमधून दिसते तेंव्हा ती नादानी अनुभवता येते.बसवर पडणाऱ्या थेंबांचा तडतड आवाज,चालणाऱ्या पावलांनी पाणी उडवल्यावर होणारा आवाज,मोठाल्या झाडांवर पाऊस कोसळल्यावर होणारा भयंकर आवाज,वीजेचा हृदयात धडकी भरवणारा आवाज यात जे नाद आहेत त्यातही तीच गोलाई आहे.या जादूसारख्या लयीच्या सुंदर दर्शनानी मी हॅंग झालो.ते एक भलं मोठं सेकंद संपत आलं असावं. मी उठलो आणि सरळ पावसात गेलो.एक दोन तीन करत हजारो थेंब अंगावर आल्यावर पाऊस कडकडून मिठी मारत असल्याचा भ्रम तयार झाला.डोळे मिटून तसाच तो आवाज ऐकत बसलो. त्यावेळी जगातली प्रत्येक लय माझ्या मनात एकरूप होऊन विलीन झाली. देवाच्या या अवर्णनीय आविष्कारामध्ये माझ्या आकाशातले काही थेंब हळूच मिसळले.
सिनेमा संपला.
त्या दिवशी मला ‘पाऊस’ समजला…………………आणि ती ‘गोलाई’.