3.झोप आणि पाऊस.

……………………………………ॐ……………………………………..
युगामागुनी चालली युगे म्हणजेच साधारण ३ तास झाले असावेत.झोपेतून पुर्णपणे जागा झाल्यावर मी कुठे आहे याची संगती लागली.एका वेगळ्याच राज्यातल्या अतिशय आवडत्या शहरातल्या(!) आश्रमातल्या एका खोलीत हा देह गेली तीन तास वेळ काळ कार्यकारण विसरून गेलेला हा पहिला विचार आला.त्यानंतर स्वताःच्या शरीचाचं आकलन झालं, मग सभोवतालच्या वस्तुंचं आकलन मनाला झालं. झोप किती वेळेला चकवणारी असते हे या तीन तासांनी दाखवून दिलं. कधीकधी वाटतं वेळ वगैरे गोष्टी अगदीच बाष्कळ आहेत त्याला फार काही अर्थ नाहीयें. अगदी पाच मिनिट झोप पण खुप तासांच्या झोपेसारखी वाटते आणि काही तास झोप झाली तरी ती मिनीटं झालीये अशी वाटते. ही तीन तासाची झोप मला तीन युगांसारखी वाटली.
या तीन तासाच्या झोपेनी मी पुर्णपणे नवीन तयार झालो.शरीरातली प्रत्येक पेशी नव्याने भेटायला आली.काही मिनिटांनी माझ्या लक्षात आलं मी कशासाठी इथे आलोय तोपर्यंत झोपेतच इकडे तिकडे बघत बसलेलो. खिडकी उघडून बाहेर पाहिलं तर भुरभुर पाऊस पडत होता. तिरुवन्नमलैला हवेत गारवा असणं हे सुख आहे.एरवी अतिशय शुष्क आणि रखरखलेला भाग म्हणून तो ओळखला जातो. थोडा वेळ तसाच पावसामुळे तयार झालेल्या गारव्याकडे बघत बसलो. तो गारवा झाडांवर आनंदात जाऊन बसला.प्रत्येक पानावर थोडाथोडा गारवा साठायला लागला मग झाडाझाडांमध्ये त्यासाठी झगडे व्हायला लागले.त्यात द्वेष नाही तर प्रेमाची भावना होती.आपल्या प्रत्येक फांदीला पुरेल एव्हढा गारवा साठवून एका झाड दुसऱ्या झाडाला तो गारवा देत असल्याचं दिसलं.झाडावरची पिवळी पानं स्वतःहून हिरव्या पानांकडे अगदी अपेक्षेनी गारवा सोपवत होती.हिरव्या पानांमधली चमक त्यामूळे वाढली. गारवा फक्त पावसाच्या थेंबांमुळेच तयार झाला नव्हता तर झाडं,हिरवी पिवळी वृद्ध पानं,काही कीटक,सरडे,असंख्य पक्षी हवेतले लाखो जीव यांना त्या लाहीपासून थोडा दिलासा मिळाल्यानी जो आनंद वाटला तोही त्या पावसाच्या थेंबांमध्ये मिसळून गेला आणि तोच ‘गारवा’ या भावनेत बदलला.’आनंद’ हा प्रत्येक जीवाचा स्थायीभाव आहे आणि तो किती कमी वेळ असला तरी हे करोडो जीव समाधानी असतात हेच तर त्या क्षणासाठी मिळणाऱ्या शांत गारव्यानी उलगडलं.म्हणूनच काळ वेळ या फसव्या संकल्पना आहेत हे जाणवलं. या दोन मिनिटात त्या जीवांना जगण्याची उर्मी मिळाली जी त्या असह्य लाहीनी जरा क्षीण केली होती. आशा ही अजून एक शाश्वत गोष्ट आहे जी या ‘आनंदा’ची अपेक्षा प्रत्येक जीवामध्ये निर्माण करते.

झगडणं हे प्रत्येक जीवाच्या माथ्यावर कोरलं गेलंय जन्मतःच.प्रमाण कमी जास्त असेल पण घेतला जाणारा प्रत्येक श्वास ही झगडण्याचीच एक क्रिया आहे.आपल्या कळत नकळत केली जाणारी प्रत्येक कृती हे झगडणंच आहे.प्रत्येक जीवाचा नव्हे प्रत्येक निर्जीवाचाही झगडा सुरू आहे.सजीव उन्नती,आनंदासाठी झगडत असतो. आनंद मिळाला की तो क्षणीक असतो हे लक्षात आलं की मग दुसरा आनंद शोधण्याचे प्रयत्न करत राहतो.तोही संपला की अजून कशात आनंद शोधला जातों.शाश्वत आनंद शोधणे हेच तर प्रत्येक सजीवाचं शेवटचं काम आहे.शाश्वत आनंद मिळेपर्यंत झगडा अखंडपणे सुरू असणारच आहे.हा सृष्टीचा नियम आहे.निर्जीवांना सजीव होण्यासाठी झगडावं लागतं सज़ीवांना निर्जीव होऊ नये म्हणून झगडावं लागतं. या शाश्वत आनंदा भोवतीच हे जग उभं आहे.प्रत्येक संकल्पना ही त्या शाश्वत आनंदाचं एक रूप आहे किंवा तो मिळवण्यासाठी सांगितलेला मार्ग आहे. त्या क्षणी तो गारवा या शाश्वत आनंदाचाच एक मार्ग वाटला. एकाच क्षणात मला जग जिंकल्याचा भास झाला.जग जिंकणं म्हणजे जगातल्या प्रत्येक कणात मिसळून जाणं.काही क्षण मी तसाच मिसळलो आणि मन एका वेग़ळ्याच अवस्थेत गेलं. आनंद…………..

जेंव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो त्यामागे कारण नक्कीच असतं. नुसतं फिरणं, एखादं ठिकाण पाहायचं असणं, भटकंती, घरापासून लांब जाणं, दैनंदीन जीवनात आलेला कंटाळा, तीर्थक्षेत्र दर्शन, निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेणं अशी अनेक कारणं असतात. मी इथे आल्यानी मला एक एक क्षण एकेका आयुष्यासारखा जगायला मिळतो म्हणून मी येतो. पण इथेच का यामागे एक कारण आहे आणि आधी सांगीतल्याप्रमाणे त्याची सुरवात कोलकत्ता इथे झाली.कदाचीत त्याही आधी.कदाचीत मागच्या जन्मात. माहीत नाही.असो. दोन दिवस हातात होते त्यात अनेक गोष्टी करायच्या होत्या जशी ही स्वर्गीय झोप. इतक्यात मला भुक लागली नसती तर नवल होतं. आंघोळ करून मी खाली त्या आश्रमाच्या कार्यालयाजवळ एक उपाहार गृह आहे तिथे गेलो. आधी म्हणल्याप्रमाणे मी आश्रमाविषयी नंतर सांगीन,हा आश्रम त्या आश्रमाच्या शेजारी आहे. इथे कदाचीत भाड्यानीच त्या उपाहारगृहाला जागा दिली गेली असावी. तिथला मालक अतिशय घाईत होता, तोच सगळ्यांच्या ऑर्डर घेत होता,मध्येच जाऊन एखादा डोसा टाकत होता, केळीची पानं रचत होता,मध्येच एकाद्याला गरम गरम मेदू वडा वाढत होता. असा चॉफेर कामात असताना बाहेर टेम्पोनी हॉर्न देऊन त्याला अजून एका कामाची आठवण करून दिली आणि तो तसाच हातातलं काम सोडून बाहेर गेला. जसे टिफीनचे डबे मिळतात एकावर एक मजले असलेले तसे अतिशय मोठे डबे त्या टेम्पोमधून आल्याचं दिसलं. सगळे पदार्थ तिथे बनत नसावेत. डबे आत आणल्यावर त्यानी परत आपल्या चॉफेर कामांना सुरवात केली. मी इडली आणि एक वडा घेतलेला. एका अतिशय प्रसन्न हसू असलेल्या आजींनी मला ते पदार्थ वाढले. मी मराठीतच त्यांच्याशी बोलायला लागलो.त्या कुठे राहतात,या वयात काम कशाला करतात असले प्रश्न विचारून कॉफी हवी आहे असं सांगीतलं. त्यांना त्यातलं फक्त कॉफी पाहिजे हे समजलं असावं कारण प्रश्नांवर त्या फक्त हसत होत्या आणि त्या परत परत हसाव्यात म्हणून कदाचीत मी अजून प्रश्न विचारत होतो. दुसरी एक बाईपण तिथे कामाला होती पण ती बनवा बनवी मधल्या तान्हुसारखी होती त्यामूळे तिच्याशी जरा जपूनच बोललो. या आजी अतिशय प्रसन्न होत्या. कामाला असलेल्यांना त्या मालकानी लाल रंगाचे कोट दिलेले. त्या बुटक्या आजी त्या लाल कोटात जरा विनोदीच दिसत होत्या. मी त्यांना विचारलं कोट कोणी दिले त्यांनी मालकाकडे बोट दाखवलं. तान्हु माझ्या प्रश्नांना वैतागलीच होती. तिनी आजींना याला पटकन कॉफी देऊन कटवा असं काहीतरी तामीळमध्ये सांगितलं त्यावर आजींनी तिला चांगलं सुनावलं आणि तान्हू तावातावानी आत निघून गेली.तिथे इतरही अनेक खवय्ये बसून डोसे,मैद्याचे केरळी परोठे, इडल्या,पुरी असे पदार्थ चाखत होते. अनेक परदेशी माणसे तिथे बसून काय काय पदार्थ आहेत याचा अंदाज घेत होती. काही परदेशी सरावलेली माणसं भराभर ऑर्डर देऊन आपण पहिल्यांदा आलो नसल्याचे पुरावे देत होती. एक भामटा एक दोन परदेशी लोकांना बसवून अध्यात्म, गुरू अशा विषयांवर बच्चन देत होता. ते भाबडेपणाने त्याचं बोलणं ऐकत होते.देवाचाच अवतार असल्यासारखा त्या भामट्याचा वावर बघून हसायला आलं.भामटा तामीळ बोलत होता आणि इंग्लीशही चांगलं बोलत होता. आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण म्हणून शांत भाव चेहऱ्यावर आणून जरा हळू बोलत अगदी ढोंगीपणानी हसलो नाही असं वाटावं इतपत हासण्याची कला भामट्यानी अवगत केलेली. आवर माईंड इज लाईक अ रिव्हर…..यु नो……..वी आर हिअर टु सेलीब्रेट………….तेव्हढ्यात तान्हुनी त्याच्या इथे कॉफी आणून आदळली आणि त्यातली त्याच्या पिशवीवर सांडली तेव्हा त्याचा चेहरा अगदी आपल्या मूळ स्वरूपात आला आणि तो जरा चिडलाच. (दिसत नाही का मी यांना टोपी टाकतोय असं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.) तान्हुच्या आदळ आपटण्याचा मला प्रचंड आनंद झाला आणि मी हसायला लागलो आणि भामटा माझ्याकडे चिडून पाहायला लागला. तान्हू जर ‘तान्हू’ नसती तर हे शक्य झालं नसतं, उद्धटासी उद्धट तसं अशा भामट्यांसाठी अशा तान्हू असणं गरजेचं आहे. त्या बापड्या आजींना हे जमलं नसतं.जरी समजा त्यांच्या हातून कॉफी सांडली असती तरी त्यांनी मुकाट्यानी त्याचा ओरडा सहन केला असता आणि तरीही त्याच प्रसन्न चेहऱ्यानी त्याला परत कॉफी दिली असती.तान्हुनी एकदा त्याच्याकडे पाहीलं, एका अतिशय खराब फडक्यानी पिशवी पुसल्याचं नाटक केलं आणि निघून गेली.जास्त लाड नाहीत.ही धावपळ सुरू असताना एक कोरीयन माणसानं माझ्यासमोर वाकून मी इथे बसलं तर चालेल का असं अगदी शांतपणे विचारलं. पांढरा पायजमा आणि जूटचा शर्ट घालून एक शबनम घेऊन तो अगदी सरावल्यासारखा वावरत होता. इतक्या ठामपणे तो कोरीयन आहे हे समजण्याचं कारण तसं त्यानी मला सांगितलं.त्याशिवाय मला समजणं शक्यच नव्हतं.तो इंग्लीश बोलत होता त्यामूळे थोडं बोलण झालं आणि त्यात त्याच्या विषयी माहीती समजली. तो दक्षिण कोरीया मधला साधारण ६० चा मनुष्य होता.त्याचा तिथेच एक छोटा कारखाना होता. त्याची बायको कॅन्सरनी गेली.तिला जाऊन १० वर्ष झाली. मुलगा नोकरीला लागला.थोडा वेळ गप्पा झाल्यावर त्यानी त्याचं आयुष्य माझ्यासमोर उलगडलं, “मला पहिल्यापासूनच मेडीटेशनची आवड होती.बायकोच्या आजारपणात तर आमची कसोटी लागली,पैसा कोणालाच कधीच पुरत नाही पण निदान आपल्याला दोन वेळेचं मिळावं अशी देवाजवळ प्रार्थना करायचो.जाणारी व्यक्ती काहीही झालं तरी इथे थांबत नाही हे आता मला समजलं आहे. तिच्यासाठी मी सगळे प्रयत्न केले तरी एका अतिशय दुःखाच्या क्षणानी मला हे सांगीतलं की तु कितीही काहीही कर आता हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.पण ती एका वेगळ्या प्रवासाला गेली असेल आणि जिथे असेल तिथे या आयुष्यापेक्षा सुखात असेल असा मी विचार केला. तेव्हापासून मला भटकंतीचं वेड लागलं निरनिराळ्या देशांमध्ये जाऊन तिथली संस्कृती बघायची आवड निर्माण झाली.तिच्या जाण्यानी माझाही निराळा जन्म झाला. अतिशय पठडीतलं आधीचं आयुष्य झुगारून मला रोज नवीन अनुभव घेण्याची भूक लागली.भारतात येण्यामागेही तेच कारण होतं पण इथे मी पहिल्यांदा आलो आणि ठरवलं मी वर्षातून दोन तीन महिने इथे राहाणारच.पहिल्यांदा आलो तेव्हा माझ्या बायकोच्या आठवणी अचानक खोल पाण्यातून वर आल्यासारख्या माझ्या मनात उफाळून आल्या. मी एखाद्या लहान मुलासारखा रडलो.तेव्हापासून मी दरवर्षी इथे नियमानी येतो.मी हे सगळं सांगून तुमच्या एकांतात अडथळा आणला मला माफ करा पण आज बऱ्याच वर्षांनी असं कोणासमोर हे बोललोय. मी दुःखी अजिबात नाही.ती तिच्या रस्त्यानी गेली,माझा मुलगा त्याच्या रस्त्यानी जाईल आणि मी माझ्या रस्त्यानी जाणार.प्रत्येकाचा रस्ता वेगळा असतो हे आता इथे आल्यावर लक्षात आलंय. आपण उगीचच काही नाती जोडतो प्रत्यक्षात नाती फक्त तात्पुरती असतात. सहप्रवासी असतात काही जे एका ठरावीक वेळेपर्यंत सोबतीला असतात पुढे तर आपल्याला एकट्यालाच जायचं आहे. हे प्रत्येकाला माहीत आहेच. लपवलं जातं,झाकलं जातं इतकंच.”

 

त्यांनी हे सगळं सांगून मला राम झू यांची एक कविता ऐकवली.त्याचा साधारण आशय असा होता की तुम्ही हरवता असं तुम्हाला वाटतं जेव्हा तुम्ही कुठेतरी जाण्याची धडपड करत असता…………..

मग त्यांनी माझी चॉकशी केली,मी इथे का येतो हे विचारलं. थोडं इकडचं तिकडचं बोलून परत एकदा पुर्ण वाकून त्यांनी माझा निरोप घेतला. अतिशय शांत स्वभावाचा तो माणूस मला भावला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा जर प्रवासच असेल तर तो माझ्या सुदैवानी अतिशय सुंदर अनुभवांचे रस्ते तुडवत सुरू होता. वेगवेगळी माणसं,त्यांचे चित्रविचित्र स्वभाव हे त्या प्रवासातले मैलाचे दगडच आहेत,माझं अनुभवविश्व समृद्ध करणारे कोरीयन भटके काका भेटले आणि एक पाडाव पार झाला. पुढेही अशीच अनुभवांची झाडं प्रवासात मिळणार आहेत हे ठरलेलंच आहे असं वाटून गेलं. संपुर्ण जगातला माणूस हा प्राणी सारखेच अनुभव घेत जगत असतो हेही त्या काकांमुळे समजलं, हेच आयुष्य लाखो माणसांच्या नशीबात असतं जी पृथ्वीवर वेगवेगळ्या जागेत आपले प्रवास पार पाडत असतात. माझ्या प्रवासात एका क्षणी दुसरा एक प्रवासी मला त्याच्या प्रवासाबद्दल सांगण्याची शक्यता तशी दुर्मीळच नाही का! त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. मी भक्तच आहे या संकल्पनेचा असं म्हणलं तरी चालेल.या अशा अनुभवांमूळे ते अजून प्रकर्षानं जाणवतं. नाहीतर मी माझं पुणे शहर सोडून बाराशे किमी अंतरावर असलेल्या एका शहरातल्या(!) एका अतिशय छोट्या उपाहारगृहात बसून स्थानीक भामटा,तान्हु, ज्यांचं हसणं बघुनंच या आपल्याला आधी भेटल्यात अशी खात्री करून देणाऱ्या आजी, दक्षिण कोरीया नकाशात कधीही पाहिलेलं नसताना तिथल्या एका माणसाचं जग बघायला मिळणं.याला फक्त योगायोग निदान मी तरी म्हणणार नाही.आपले मागचे जन्म कधीच समजू नयेत असही तेव्हा वाटलं नाहीतर अशी आश्चर्यकारक भेट तितकी आश्चर्यकारक झाली नसती. पैसे देऊन पाण्याची बाटली घेऊन मी निघालो. भामटा अजुनही बच्चन टाकत होता.तान्हु दुपारच्या जेवणाला येणाऱ्या माणसांसाठी ताटं रचत होती. मालक जरा त्याच्या जागेवर निवांत बसलेला दिसला. आजी माझ्याकडे पाहात हासत होत्या आणि कदाचीत त्यांनाही आमचे काही रूणानुबंध असल्याचं जाणवलं असेलही.
दोन दिवसातले काही तास संपले…………………….. किंवा मिळाले………………………..